नागपूर : पाचपावली भागातील शाळेसमोरुन दोन बहिणींचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्याला पाचपावली पोलिसांनी सहा तासांत अटक केली. त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. कळमेश्वरमधील लोणारा येथून दोघींची सुखरुप सुटका करण्यात आल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. सय्यद जुबेर सय्यद रहमत अली (वय १९, रा. टिपू सुलतान चौक, मेहबुबपुरा झोपडपट्टी), असे अटकेतील अपहरकर्त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय मुलगी सहावीत तर १६ वर्षीय मुलगी सातवीत शिकते. दोघीही बहिणी आहेत. दोघी जुबेर व विधिसंघर्षग्रस्त बालकाला ओळखतात. बुधवारी सायंकाळी शाळा सुटली. दोघी शाळेबाहेर आल्या. यावेळी जुबेर व विधिसंर्घषग्रस्त बालकाने दोघींना सोबत नेले. शाळा सुटल्यानंतरही मुली परत न आल्याने नातेवाइकांनी दोघींचा शोध घेतला.
सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नातेवाइकांनी पाचपावली पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एकाचवेळी दोन बहिणी शाळेसमोरुन बेपत्ता झाल्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी अपहरणकर्त्यांचा छडा लावण्याचे निर्देश वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांना दिले.
मेश्राम यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक एस. एस. सुरोशे, महिला उपनिरीक्षक रामटेके, हेडकॉन्स्टेबल चिंतामण डाखोळे, शिपाई रवीशंकर मिश्रा, राकेश तिवारी, विनोद बरडे, नितीन धकाते यांनी मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांनी शाळेत लागलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. दोघी एका युवकासोबत जात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मुलींच्या आईला दाखविले. तिने मुलींसोबत असलेला युवक हा जुबेर असल्याचे सांगितले. पोलिसांनी जुबेर याचा शोध घेऊन त्याला अटक केली. विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने मुलींना कळमेश्वरमधील लोणारा येथे नातेवाइकाकडे ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांचे पथक लोणारा येथे पोहोचले. मुलींची सुटका करून विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. गुरुवारी पोलिसांनी जुबेर याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.
अजमेरला नेणार होते
लोणारा येथील नातेवाइकाकडे रात्रभर मुलींना ठेऊन गुरुवारी सकाळी जुबेर व विधिसंघर्षग्रस्त बालक त्यांना अजमेर येथे नेणार होते. तेथे ते दोघींची विक्री करणार होते, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली. यादिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.