नागपूर : गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण राज्य पेटविणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अखेर गुरुवारी उच्च न्यायालयाने संरक्षण प्रदान केले. टिकणार की नाही, अशा चर्चांमध्ये राहिलेला हा प्रश्न निकाली लागला आणि नागपूरसह राज्यभरातील मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध संघटना आणि मराठा समाजबांधवानी दिवसभर फटाके फोडून आणि पेढे वाटून आरक्षणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी मराठा मोर्चांमध्ये शहीद झालेल्या ४३ बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सकल मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मूकमोर्चे काढण्यात आले. लाखोंची उपस्थिती असूनही शांतता मार्गाने झालेल्या या मोर्चांची संपूर्ण विश्वाने दखल घेतली. त्यानंतर सरकारने मराठा आरक्षणला मंजुरी दिली. परंतु, आरक्षण मिळत नाही तोच न्यायालयीन लढाई सुरू झाली. एकीकडे सरकार आरक्षण देणारच म्हणत असताना दुसरीकडे न्यायालयीन संघर्षात मराठा आरक्षण अपयशी ठरणार का, अशी स्थिती निर्माण झाली होती. राज्य सरकारने दाखविलेल्या समर्थनामुळे सरतेशेवटी मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय लागला. निर्णय लागताच महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर सायंकाळी सकल मराठा समाजाने शहीद मराठा बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये नरेंद्र मोहिते, वंदना शिर्के-रोटकर, गीता वाघ-निंबाळकर, नंदा धंदरे, दिलीप धंदरे, गुणवंत माने, गजानन जगताप, बाळासाहेब गायकवाड, तेजसिंग मोरे, विजय काळे, भूपेश शिंदे, नितीन शेलार, अखिल पवार, दत्ता शिर्के, शिरीष राजे शिर्के, लक्ष्मीकांत किरपाने, महेश पवार, कविता भोसले, श्वेता भोसले, काकी गुजर आदींचा समावेश होता.
समाजबांधवाना श्रेय
सरकारने दिलेल्या आणि न्यायालयाने वैध ठरविलेल्या मराठा आरक्षणाचे स्वागत आहे. शांतीप्रिय मार्गाने मराठा समाजबांधवांनी आंदोलन केले. त्यामध्ये काही समाजबांधव शहीद झाले. त्यानंतरही लढा कायम होता. समाजबांधवांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे आरक्षण मिळाले, याचा आनंद आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय समाजबांधवांना आहे.
-श्रीमंत मुधोजी राजे भोसले
शहिदांना समर्पित
मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाबाबत संपूर्ण समाज सरकारचा आभारी आहे. मागील सरकारनेदेखील आरक्षण दिले, पण पुढे ते टिकले नाही. विद्यमान सरकारने दिलेला शब्द पाळला. मराठा आरक्षणावर न्यायालयाने केलेला शिक्कामोर्तब समाजबांधवांसाठी आनंदाची बाबत आहे. आरक्षण ४३ शहीद बांधव आणि कोपर्डी येथील पीडित मुलीला समर्पित आहे.
– नरेंद्र मोहिते, सकल मराठा समाज
तीन दशकांचा लढा
गेल्या तीस-बत्तीस वर्षांपासून आरक्षणाचा लढा सुरू होता. त्याला अखेर आज यश मिळाले आहे. ५८ मोर्चे आणि दोन ठोक मोर्चे काढून मराठा समाजाने सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडले. या यशाचे श्रेय मराठा बांधवांना आहे. एक ऐतिहासिक असा हा निर्णय आणि विजय आहे. मुख्य म्हणजे या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला.
– दत्ता शिर्के, शिवराज्याभिषेक सोहळा समिती
अधिक वाचा : OYO Townhouse reaches a milestone 100 hotels; becomes India’s largest mid-market boutique hotel brand