नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनी व मानकापूर भागात सापळा रचून मध्यप्रदेशातून नागपुरात दारूची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून दोन कारसह १६ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. अजय जीवन बांते (वय ३४, रा. सुधाविहार अपार्टमेंट,वंजारीनगर) व नवज्योतसिंग स्वरुपसिंग धालीवाल (वय २१, रा. दुर्ग, छत्तीसगड), अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक मिलिंद पटवर्धन व अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे अधिकारी केशव चौधरी, बापू बोढारे, सहायक उपनिरीक्षक प्रशांत येरपुडे, संजय मोरे, चंद्रशेखर दरोडे, कवडू रामटेके, राहुल पवार, रवींद्र निकाळजे, महादेव कांगणे, नीलेश पांडे यांनी वंजारीनगर पाण्याच्या टाकी परिसरात सापळा रचला.
अधिकाऱ्यांना एमएच-४३-एएफ-५७४३ या क्रमांकाच्या वाहनावर संशय आला. त्यांनी वाहन थांबविले. तपासणी केली असता वाहनात मध्यप्रदेशात निर्मित विदेशी दारूच्या २२५० बाटल्या आढळल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांते याला अटक करून कारसह आठ लाख ९६ हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
याचप्रमाणे मानकापूर उड्डाणपूल परिसरात एमएच-१२- एलव्ही-६७३१ या क्रमांकाच्या वाहनातून दोन हजार दारूच्या बाटल्या आढळल्या. अधिकाऱ्यांनी धालीवाल याला अटक करून कार व दारूच्या बाटल्यांसह सात लाख २० हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. दोघांची गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
अधिक वाचा : मान्सून अखेर कोकणात दाखल; लवकरच राज्यभर बरसणार