नागपूर : प्रचंड खर्च आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी येत्या दहा वर्षांत सर्वच रेल्वे गाड्या सौर आणि पवन उर्जेवर चालविण्याचा विचार भारतीय रेल्वेतर्फे केला जात आहे.
२०२२ पर्यंत देशात डिझेल इंजिन पूर्ण बंद करण्याचा विचार असून, २०३० पर्यंत सर्व रेल्वे गाड्या सौर उर्जेवर चालविण्यात येणार आहेत. रेल्वे सुरू झाली त्यावेळी कोळशावर चालणारे इंजिन होते. काळानुसार त्यात बदल होत गेला व डिझेल इंजीन आले. मात्र त्यानंतर विजेवर चालणारे इंजीन आले आणि गाड्यांचा वेग वाढला. आज बहुतांश गाड्यांना विजेवर चालणारेच इंजिन आहे. मात्र यासाठी वीज मोठ्या प्रमाणात लागते व रेल्वेचा मोठा खर्च या विजेवर होत असतो. गाड्या सौर किंवा पवन ऊर्जेवर धावू लागल्या तर रेल्वेची मोठी बचत होईल तसेच पर्यावरणाच्या दिशेनेही ते मोठे पाऊल ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडशी दोन मेगावॉटचा करार केला आहे. भविष्यात या कराराची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे २०२२ पर्यंत भारतीय रेल्वेत पूर्ण विद्युतीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर २०३० पर्यंत ग्रीन रेल्वेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सौर उर्जेसहच पवन उर्जेचाही उपयोग केला जाणार आहे.
भारत हेवी इलेक्ट्रक्लसशी जो करार झाला आहे त्यानुसार भारतीय रेल्वे या कंपनीकडून दोन मेगावॉट वीज घेईल व या विजेचा उपयोग विविध कामांसाठी केला जाईल. जगातील पहिले ग्रीन रेल्वे होण्याचा भारतीय रेल्वेचा मानस आहे व त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.
अधिक वाचा : Nagpur girl Sugandha Date crowned as the winner of Zee TV’s Sa Re Ga Ma Pa Li’l Champs