नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा आज नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. गडकरी यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे.
या आधीच्या सरकारमध्ये गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाचा कार्यभार होता.
मे 2014 पासून गडकरी लोकसभेचे खासदार आहेत. 1989 ते 2014 या काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्रात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला –
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून प्रताप चंद्र सारंगी यांनीही स्वीकारला पदभार :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमई म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा आज नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून प्रताप चंद्र सारंगी यांनीही पदभार स्वीकारला.
रोजगार निर्मितीद्वारे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणे हे सर्वात महत्वाचे काम करायचे असल्याचे गडकरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. ग्रामीण, निम-शहरी आणि शहरी भागामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी एमएसएमई हे महत्वाचे मंत्रालय असल्याचे ते म्हणाले.
आयात कमी करणे ही सध्याची गरज असून आयात वस्तूंच्या जागी देशांतर्गत उत्पादन झालेल्या वस्तू याव्यात यासाठी लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर योगदान देऊ शकते असेही त्यांनी सांगितले.
गडकरी आणि सारंगी या दोन्ही मंत्र्यांचे एमएसएमई सचिव डॉ. अरुण कुमार पांडा आणि केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्यासह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
अधिक वाचा : Nitin Gadkari takes charge as Micro Small and Medium Enterprises Minister