नागपूर : ‘आमच्या पिढीने १९७१ साली अवघ्या तेरा दिवसात पाकिस्तानचे तुकडे केले होते. तरी त्यांचा दुष्टपणा कायमच आहे. आत्मसन्मान, देशप्रेम शिकवून गेलेल्या स्वा. सावरकर, शिवाजी महाराजांचे सळसळणारे रक्त घेऊन जन्माला आलेली आताची पिढी जेव्हा तुटून पडेल तेव्हा पाकिस्तान्यांचे चार तुकडे होतील. त्याची एक झलक त्यांना बालाकोटमध्ये बघायला मिळाली आहे’, हे त्वेषपूर्ण उद्गार आहेत, मेजर जनरल (निवृत्त) जी. डी. बक्षी यांचे.
मंगळवारी मेजर जनरल बक्षी उभे राहिले, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी श्रोत्यांना जिंकून घेतले. सभागृहाने त्यांना उभे राहून मानवंदना केली आणि ‘जयहिंद’च्या घोषणांनी खचाखच भरलेले सभागृह दुमदुमले. प्रसंग होता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या सामाजिक अभिसरण व तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराचे वितरणाचा. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे यांच्या अध्यक्षतेखाली सायंटिफिक सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मेजर जनरल (निवृत्त) जी. डी. बक्षी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या देशात ५० टक्के युवक हे २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून त्यांची फौज उभी करण्याचा प्रयत्न झाला, तर जगातली ती सर्वांत मोठी फौज ठरेल. आपले सैन्य आज तांत्रिकदृष्ट्याही सक्षम असल्याचे बालाकोट हल्ल्याने दाखवून दिले आहे. एवढी सैनिकी ताकद आज कोणत्याही देशाजवळ नाही. आता आपण पाकिस्तान्यांसमोर एक लक्ष्मणरेखा आखून दिली असून ती पार कराल तर कुत्र्यासारखे मराल, असा इशाराही दिला आहे. महाभारताने आपल्याला ‘अहिंसा परमोधर्म’ असे सांगितले असले, तरी धर्माच्या रक्षणासाठी हिंसाच उत्तम आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे म्हणणे होते. आजच्या पिढीचे प्रेरणास्थान स्वा. सावरकर आणि शिवाजी महाराज हे आहेत. सावरकरांनी जी देशप्रेमाची भावना युवकांच्या मनात निर्माण केली होती, त्यांनी जे अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते ते आजची ही युवा पिढी पूर्ण करेल, असा विश्वास बक्षी यांनी व्यक्त केला.
‘दे दी हमे आजादी बिना खड्स बिना ढाल’ असे म्हणणे पाप असून सुभाषचंद्र बोसांच्या आजाद हिंद सेनेमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. पण गेल्या ७२ वर्षात आजाद हिंद सेनेची कुणालाच आठवण झाली नाही. नरेंद्र मोदी सरकारने पहिल्यांदा आजाद हिंद सेनेला राजपथावर आणले. त्यांचा सन्मान केला. आतापर्यंत लढल्या गेलेल्या निवडणुका या जातीच्या आधारवर होत्या. यावर्षी पहिल्यांदा त्या देशभक्तीच्या आधारे त्या लढल्या गेल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंती निमित्ताने आज पुरुषोत्तम मार्तंड उपाख्य बापू जोग व मीना जोग यांना सामाजिक अभिसरण पुरस्कार तर आत्मदीपम् सोसायटीच्या संस्थापक जिज्ञासा कुबडे यांना तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हाऊसफुल्ल गर्दी
मेजर जनरल जी. डी. बक्षी यांना ऐकायला श्रोत्यांची हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. सभागृह खचाखच भरून गेले होते. काही लोकांनी स्टेजवर, मधल्या ओळी खाली बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला. बाहेरही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. उभे राहायलाही जागा नसल्यामुळे अनेकजण परत गेले. बक्षी यांनी भाषणाला सुरुवात करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
जोरदार घोषणाबाजी
जी. डी. बक्षी यांचे भाषण सुरू होताच ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा झाल्या. त्यांनी राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तेव्हाही श्रोत्यांनी त्यांचा जयजयकार केला. जी. डी. बक्षी यांच्या त्वेषपूर्ण भाषणादरम्यान अनेकदा वंदेमातरमचेही सूरू उमटले. त्यांचे भाषण आटोपल्यानंतर सर्व श्रोत्यांनी उभे राहुन त्यांना मानवंदना केली व ‘जयहिंद’च्या घोषणांना सभागृह हालून गेले.
अधिक वाचा : नागपुरात उष्माघाताचे १० बळी