नागपूर : चोरट्यांनी जरीपटक्यातील तीन ठिकाणी व कोराडीत एका ठिकाणी घरफोडी करून रोख रमकेसह सव्वा पाच लाखांचा ऐवज लंपास केला. या घरफोड्यांनी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.
जरीपटक्यातील नागार्जुन कॉलनी येथील राहुल शालिकराम भगत (वय ४२) हे १४ मे रोजी कुटुंबासह अमरावती येथे गेले. यादरम्यान दाराचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसले. आलमारीतील ४५ हजारांची रोख, दागिने असा एकूण एक लाखाचा ऐवज चोरी केला. १७ मे रोजी भगत नागपुरात परतले असता ही घटना उघडकीस आली. दुसरी घटना जरीपटक्यातील सन्यालनगर येथे घडली. पांडुरंग मणिराम हुमणे (६८) हे १७ मे रोजी सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून इमामवाडा येथे नातेवाइकाकडे गेले. संधी साधून चोरट्यांनी एक लाख २६ हजारांची रोख व दागिने एसा एकूण सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. शनिवारी सकाळी हुमणे घरी परतले असता घरफोडीची घटना उघडकीस आली.
तिसरी घटना विश्रामनगरमधील त्र्यंबक शिवदास कांबळे (वय ६४) यांच्याकडे घडली. कांबळे हे त्यांच्या पत्नीसह मुंबई येथे गेले. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने ९४ हजारांचा ऐवज चोरी केला. कांबळे नागपुरात परतले असता ही घटना उघडकीस आली. चौथी घटना कोराडीतील ओमनगरमधील मुरलीधर हाऊसिंग सोसायटी येथे घडली. बलराम बकाराम सोनवाने (वय ४८) हे बाहेरगावी गेले. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आलमारीतील दीड लाखाची रोख व दागिने असा एकूण सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. चारही प्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : काळ्या पैशाची माहिती देण्यास सरकारचा नकार