नागपूर : निवडणुकीत भाजपला फायदा करून देण्यापेक्षा मी मरण पत्करेन असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी गुरुवारी केले. रायबरेलीमध्ये एका मुलाखतीदरम्यान प्रियंका यांना विचारण्यात प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांमुळे भाजपला फायदा होईल, असे विचारताच प्रियंका म्हणाल्या, ‘काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला अभ्यासाअंती निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. आम्ही या निवडणुकीकडे एक युद्ध म्हणून पाहत आहोत. प्रत्येक ठिकाणी आम्ही सक्षम उमेदवार दिला आहे. आमच्या उमेदवारामुळे भाजपला फायदा होईल अशी परिस्थिती कुठेही नाही किंवा आमच्यामुळे भाजपला फायदा होईल असे वातावरणही नाही. किंबहुना भाजपला फायदा होईल असा एकही उमेदवार आम्ही दिलेला नाही. भाजपला फायदा करून देण्यापेक्षा मी मरण पत्करेन.’
‘नागरिकांचा सन्मान म्हणजे राष्ट्रवाद’
‘देशावर आणि नागरिकांवर प्रेम करणे, त्यांचा सन्माण राखणे हा राष्ट्रवादाचा खरा अर्थ आहे. परंतु, भाजप कोणत्याच गोष्टीत हा सन्मान राखताना दिसत नाही,’ अशी टीका प्रियंका यांनी अन्य एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केली. ‘मी प्रचारासाठी जिथे जिथे फिरले, तिथे नागरिकांमध्ये सरकारविरोधात असंतोष दिसून आला. देशातील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २३ मे रोजी निवडणूक निकालातून योग्य तो संदेश देईल. कोणीही नागरिकांचा आवाज, त्यांची विचारसरणी दाबत असेल, तर त्याचे परिणामही भोगावे लागतील’, असे त्या यावेळी म्हणाल्या.
निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत प्रियंका यांनी गुरुवारी रायबरेलीतील कुचरिया गावातील गारूड्यांच्या वस्तीला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. इतकेच नव्हे, तर गारूड्यांच्या टोपलीतून एक साप हातात पकडून त्या काही वेळ त्याच्याशी खेळत राहिल्या.
अधिक वाचा : CM pays tributes to jawans killed in Gadchiroli ambush