नागपूर : देहव्यापार प्रकरणात जामीन मिळवून देणे व कारवाई न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा रजत सुभाष ठाकूर (२९, म्हाडा कॉलनी) सीताबर्डी पोलिस स्टेशनमधून पसार झाला आहे. फरार झालेला हा युवक अद्याप लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हैराण झाले आहे. या युवकाला शोधण्यासाठी नागपूर, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर ग्रामीण भागात विभागाची पथके रवाना झाली आहेत. या घटनेने पोलिस व लाचलुचपत प्रतिबंधक विभागात खळबळ उडाली आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बेलतरोडी भागातील हायप्रोफाइल देहव्यापार अड्ड्यावर छापा टाकून २६ वर्षीय महिलेच्या पतीला अटक केली होती. याप्रकरणात तो कारागृहात आहे. त्याला जामीन मिळवून देण्यासाठी तसेच पुढे कारवाई न करण्यासाठी व पोलिसांना ‘सेट’ करण्यासाठी रजतने ८० हजार रुपयांची मागणी त्याच्या पत्नीकडे केली होती. सामाजिक सुरक्षा विभागातील हेडकॉन्स्टेबल मिश्रा हा परिचयाचा असल्याचेही त्याने महिलेला सांगितले. महिलेने एवढी रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर ‘५० हजार रुपयांमध्ये काम करून देतो, पहिला हप्ता १५ हजार रुपये द्यावा लागेल’, असे त्याने महिलेला सांगितले. महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
एसीबीने मंगळवारी सायंकाळी धरमपेठेतील चिल्ड्रेन ट्राफिक पार्क परिसरात सापळा रचला. १५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये नेले. त्याच्याविरुद्ध लाचेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संधी साधून रजत हा पोलिस स्टेशनमधून पसार झाला.
अधिक वाचा : दगाफटक्याबाबत सावध रहा; उद्धव यांच्या सूचना