नागपूर : देशभरात लोकसभा निवडणूक गाजत असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणाचा मुद्दा प्रकाशात आणला आहे. राम मंदिर निर्माण करणे, हे राष्ट्रकार्य असल्याचे सांगत त्यासाठी सर्वांनी संकल्पबद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी शुक्रवारी केले.
राजाबाक्षा येथील पुरातन हनुमान मंदिरातील शोभायात्रेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भागवत बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या हस्ते हनुमानाची पूजा आणि आरती झाली. तत्पूर्वी, उपस्थित भाविकांना संबोधित करताना भागवत म्हणाले की, ज्या कुणा भगवंताची तुम्ही भक्ती करता, त्याचे गुण स्वत:ने अंगीकारायला हवे. जर तुम्ही हनुमंताचे उपासक असाल, तर नियंत्रित जीवन, चारित्र्यसंपन्नता, शील तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसायला हवे. प्रत्येकाने हनुमंताप्रमाणे सद्गुणसंपन्न व्हायला हवे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणे, त्यांचा अंगीकार करणे रामकार्य असून, रामकार्य हेच राष्ट्रकार्य आहे. आजच्या परिस्थितीत राम मंदिर होणे हेदेखील राष्ट्रकार्य आहे. त्यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा. नम्रता, अहंकारशून्यता ही प्रभू हनुमानाच्या स्वभावाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. हनुमान नेतृत्वगुणसंपन्न, चतुर, विवेकी, संघटनकुशल होते. तरी पण ते आजीवन श्रीरामांच्या चरणी कुठलाही अहंगंड न बाळगता सेवाधीन राहिले. असाच भाव राष्ट्रकार्य करणाऱ्यांमध्ये असायला हवा. राष्ट्रकार्य करताना ते मी करतोय, हा अंहभाव दूर सारून कार्यरत राहायला हवे, असे त्यांनी सांगितले.
मुख्य सोहळ्यापूर्वी विवेक तिवारी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गोपीनाथ तिवारी यांच्या हस्ते डॉ. भागवत यांचे स्वागत करण्यात आले. मंदिरातर्फे त्यांना भगवी टोपी आणि पंचा प्रदान करण्यात आला. जय श्रीरामाच्या जयघोषात भागवत यांनी हनुमानाची मूर्ती रथापर्यंत आणली. त्यानंतर शोभायात्रेचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाला आमदार सुधाकर कोहळे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : एटीएसने साध्वी प्रज्ञाचा छळ केलाच नव्हता: मानवी हक्क आयोग