नागपूर : स्मार्ट सिटीच्या महिनाभरातील कामाच्या आधारावर नागपूर शहर पुन्हा अव्वल स्थानी आले आहे. अगदी अटीतटीच्या या गुणांकनात ०.०६ गुण अधिक मिळवित नागपूरने हे स्थान कायम राखले. नागपूरच्या पारड्यात ३६७.४२ गुण पडले. तर, दुसऱ्या क्रमांकावरील अहमदाबादला ३६७.३६ गुण मिळाले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने शुक्रवारी ही क्रमवारी जारी केली.
हे गुणांकन विविध बाबींचा आधार घेऊन करण्यात येते. खर्च, प्रकल्प अंमलबजावणी आणि पाच वर्षांतील स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रगती या आधारावर गुणांकन असते. फेब्रुवारीत नागपूर दुसऱ्या क्रमांकावर घसरले होते. त्यावेळी नागपूरला ३६६.४३ गुणांकन होते. या महिन्यात अहमदाबादने ३६७.३६ गुण मिळवित अव्वल क्रमांक मिळविला होता. यावेळी परत नागपूरने पहिला क्रमांक पटकावला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहरात अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत निविदा श्युअर प्रकल्प आणि होम स्वीट होम प्रकल्पाचा समावेश आहे. तर, निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी क्षेत्राधिष्ठित विकास प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक बाजारपेठांचा विकास हा प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. एकूण शंभर स्मार्ट सिटीच्या क्रमवारीत पुणे शहराने अकराव्या क्रमांकावर २१३.५० गुण घेतले. तर, १९९ गुण घेत पिंपरी-चिंचवड शहर क्रमवारीत १९व्या क्रमांकावर आहे.
२ फेब्रुवारी २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शहरात अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले होते. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, भरतवाडा आणि पुनापूर या भागातील १७३० एकर जमिनीवर अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांना राज्य व केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत करण्यात येत आहे.
दृष्टिक्षेपात… शहर गुणांकन क्रमवारी
नागपूर ३६७.४२ १
अहमदाबाद ३६७.३६ २
सुरत ३४५.९९ ३
भोपाळ ३३६.० ४
रांची ३११.६५ ५
अधिक वाचा : जगनाथ रोड मर्चंट्स असोसिएशन बनी शहर कि नंबर १ संस्था