नागपूर : कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास कॅन्सर पूर्णत: बरा होतो. मृत्यूचा धोका टाळता येतो. उपचाराचा खर्च वाचतो, म्हणूनच जागतिक कॅन्सर दिनानिमित्त लोकांमध्ये या रोगाविषयी माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व विविध संस्थांच्यावतीने रॅली, पोस्टर प्रदर्शन, मानवी साखळी व विविध स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
रॅलीला हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुब्रजित दासगुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी ४५० वर डॉक्टर, परिचारिका, विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलल्या कॅन्सर जनजागृतीचे फलक व घोषवाक्यांनी लक्ष वेधून घेतले. रॅलीचा समारोप हॉस्पिटलसमोर मानवी साखळी तयार करून झाला.
कॅन्सर जनजागृती पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात डॉ. दासगुप्ता, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, डॉ. रामकृष्ण छांगाणी यांनी कॅन्सरसंबंधित विविध विषयांवर प्रकाश टाकला. आभार हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. बी. के. शर्मा यांनी मानले. या उपक्रमाला कॅन्सर रिलीफ सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ ऑटोलारिंगोलॉजिस्ट ऑफ इंडिया, अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर ऑबेस्ट्रीक अॅण्ड गायनेकॉलॉजिकल सोसायटी, इंडियन डेन्टल असोसिएशन, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया, शासकीय दंत महाविद्यालय, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, जेसीआय-मेडिकोज, लायन्स क्लब मेडिकोज, आयएमएस, एएमडब्ल्यूएन, नार्ची, लॉयन्स क्लब नागपूर, कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, मधुकराव महाकाळकर नर्सिंग स्कूल, शुअरटेक नर्सिंग कॉलेज, दळवी नर्सिंग कॉलेज, स्नेहांचल आणि हेडगेवार रक्तपेढी आदींनी सहकार्य केले.
अधिक वाचा : मनपा-ग्रीन व्हिजीलची मोहीम : ३६३ झाडांवरील जाहिरातींचे फलक काढले