नागपूर : ‘आपली बस’सेवेत लवकरच शहरातील दिव्यांग व गतिमंद व्यक्तींना मोफत प्रवास करता येऊ शकेल. यासंबंधीचा प्रस्तावा नागपूर महापालिकेच्या समाजकल्याण विभागाने परिवहन समितीला सादर केला आहे. यावर सोमवार, ४ फेब्रुवारीला परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
या प्रस्तावासंदर्भात परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी २० ऑक्टोबरला समाजकल्याण विभागाच्या उपायुक्त रंजना लाडे यांनी यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला होता. राज्य सरकारच्या योजनेनुसार शहर बससेवेत दिव्यांग, गतिमंद व्यक्तींना मोफत प्रवास करू द्यावा, अशी तरतूद केली आहे. सध्या नागपूर महापालिका आपली बससेवेने प्रवास करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना ७५ टक्के सवलत देते, तर त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला ५० टक्के सवलत देण्यात येते.
दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी, ‘शहर बससेवेतून प्रवास करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये’, असे निर्देश नागपूर महापालिकेला दिले होते. त्यानुसार, समाजकल्याण विभागाच्या उपायुक्तांनी शहर बससेवेने प्रवास करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असा निर्णय घेतला. तसेच या मोफत तिकिटांचे शुल्क समाजकल्याण निधीतून वळते करण्यात येणार आहे. नेमके किती अशा व्यक्ती प्रवास करतात, यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर बस ऑपरेटरकडे हा हा निधी डीआयएमटीएसकडून जमा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात शाळा, कॉलेजेस, कार्यालयीन कामकाजानिमित्त शहर बससेवेचा वापर दिव्यांग व्यक्तींकडून करण्यात येतो.
त्याचबरोबर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांना शहर बससेवेत शंभर टक्के सवलत देण्यात येते. सध्या महापालिकेच्या शाळा वगळता ज्या इतर शाळांच्या मार्गांवर शहर बससेवा सुरू आहे, त्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना ६६.६६ टक्के सवलत देण्यात येते. इतकेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांनाही ५० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा : नागपूर रेल्वेत गैरवर्तणुकीवर लक्ष ठेवणार ‘ बॉडी वॉर्न कॅमेरा ‘