नागपूर – कोणत्याही उद्योगामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या देण्याच्या नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांना यापुढे सरकारचे सहकार्य राहणार नाही. त्यांना दिली जाणारी प्रोत्साहने आणि परतावे रोखून धरले जातील, असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नागपुरात दिला.
उद्योगांच्या उभारणीसाठी महाराष्ट्रात होणाऱ्या सामंजस्य करारांचे रूपांतर प्रत्यक्ष उभारणीत होण्याचे प्रमाण ८३ टक्के आहे. आम्ही आकडेवारी घेतली असता गुजरातमध्ये हेच प्रमाण २० ते ३० टक्क्यांच्या वर नाही, अशी माहितीही देसाई यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने देसाई नागपुरात होते. राज्यात आतापर्यंत घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांमध्ये किमान पाच हजारांवर युवकांना थेट रोजगार मिळाला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. ते म्हणाले, गुंतवणुकीबाबत जे काही आरोप होत आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाहीत. महाराष्ट्रात गुंतवणुकीला पोषक असे वातावरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होते. त्याचा थेट पुरावा म्हणजे देशात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्के एकट्या महाराष्ट्रात होते. तर देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा टक्का ३५ टक्के आहे, असे रिझर्व्ह बँकेची आकडेवारी सांगते, असे त्यांनी सांगितले. पार्श्वभूमीवर युतीचा निर्णय पक्षप्रमुखच घेतील, असेही देसाई यांनी सांगितले.
अधिक वाचा : युथ एम्पॉवरमेंट समिट : तीन हजारांवर युवकांना मिळाला रोजगार