युथ एम्पॉवरमेंट समिट : तीन हजारांवर युवकांना मिळाला रोजगार

युथ एम्पॉवरमेंट समिट : तीन हजारांवर युवकांना मिळाला रोजगार

नागपूर : युथ एम्पॉवरमेंट समिट च्या माध्यमातून गेल्या तीन दिवसांत ३० हजार तरुणांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. यापैकी ३ हजार तरुणांना जागेवरच रोजगार मिळाला. दोन हजारांवर तरुणांची निवड झाल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी दिली.

फॉर्च्यून फाउंडेशनसह जिल्हाधिकारी कार्यालय, इंजिनिअरिंग कॉलेजेस प्लेसमेंट असोसिएशन (ईसीपीए) आणि नागपूर महापालिकेतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात युथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित केली होती. भाजपचे महामंत्री उपेंद्र कोठेकर उपस्थित होते. रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या १०६ कंपन्या सहभागी झाल्या. त्यात नागपूरच्या ४४ कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांकडून आमदार निवास येथे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

मुलाखतीसाठी २१ हजार युवकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले. शेवटच्या तीन दिवसांत पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू होते. तो आकडा ३० हजारांपर्यंत पोहोचला.

रोजगार देण्याच्या बाता अनेक जण करतात, परंतु त्यादृष्टीने कृती किती होते, हा प्रश्‍न आहे. युथ एम्पॉवरमेंट समिट एक चळवळ आहे. ती आता विदर्भापुरती मर्यादित न राहता देशपातळीवर जावी, असे आवाहन भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले. बबलू चौधरी यांनी विदर्भातील संत्रा व इतर फळांचा व्यवसाय विदेशात कसा केला जातो, यावर मार्गदर्शन केले.

दिव्यांग उद्योजक जयसिंग चव्हाण यांनी दिव्यांगावर मात करून कोट्यवधींचा व्यवसायात कसा उभारला, याबाबत माहिती दिली. ‘महिला उद्योजिका काळाची गरज’ यावर जयश्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी सोशल मीडियाचा उपयोग कसा करावा, स्वत:चे कौशल्य कसे निर्माण करावे, व्यवसाय करताना येणारे चॅलेंजेस, ग्राहक व आपल्यातील संबंध, यावर माहिती दिली.

अधिक वाचा : महिला उद्योजिका मेळाव्याचे थाटात उद्‌घाटन : ३०० स्टॉल्स, संगीत संध्याने रसिकांना रिझविले