शिर्डी : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत दिली जाईल. त्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडून ज्या योजना सुरु केल्या जातील त्या सर्व योजनांना केंद्राकडून पूर्ण सहकार्य मिळेल असे मोदी म्हणाले. ते शिर्डीमध्ये साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते.
देशातील शेतकऱ्यांना पाण्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत अडकून पडलेल्या विविध योजना पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे. महाराष्ट्र सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. या योजनेमुळे राज्यातील १६ हजार गावे दुष्काळ मुक्त झाली, आणखी ९ हजार गावे दुष्काळ मुक्तीच्या मार्गावर आहेत असे सांगत मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
शेतकऱ्यांच्या पीकाला जास्त भाव मिळावा यासाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरु आहेत. आमच्याच सरकारने एमएसपीची शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. सरकारने ऊसासह खरीप आणि रब्बीच्या २१ पिकांचे समर्थन मूल्यावर ५० टक्के लाभ निश्चित केला आहे. सरकार शेतीबरोबर पर्यटनालाही चालना देत आहे. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. शताब्दी वर्षात शिर्डीला येण्याची संधी मिळाली त्याचा मनापासून आनंद होतोय. तुमच्या प्रेमामुळे मला नवी ऊर्जा मिळते. साईसेवकांना मी मनापासून नमन करतो.सबका मालिक एक साईबाबांचा मंत्र होता. साई समाजाचे होते, आणि समाज साईंचा. साईंनी समाजसेवेचे मार्ग दाखवले. साईंनी दाखवलेल्या या मार्गावर साई ट्रस्ट काम करतेय अशा शब्दात मोदींनी साई संस्थानचे कौतुक केले.
अधिक वाचा : समाधी शताब्दी सांगता सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीत दाखल