समाधी शताब्दी सांगता सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीत दाखल

साईबाबा समाधी शताब्दी

शिर्डी – साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी नरेंद्र मोदींचे शिर्डीत आगमन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले. याठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर मोदी उपस्थितांना संबोधित करतील त्यानंतर घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचे वाटप केले जाणार आहे.

पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. ९ अतिरिक्त पोलिस अधीक्षक, १५० सहायक उपनिरीक्षक, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दहशतविरोधी पथकाच्या चार टीम, बॉम्बशोधक पथकाच्या ९ पथके, शीघ्र कृतिदलाची ८ पथके, दंगल नियंत्रण पथकाची ६ पथके, व्हिडिओ कॅमेरे व ड्रोनची नजर असणार आहे.

सकाळी १० वाजता पंतप्रधानांचे विशेष विमानाने शिर्डी विमानतळावर आगमन झाले. मंदिरात साईंची पाद्यपूजा व दर्शन झाल्यावर लेंडीबागेत जाऊन साई समाधी शताब्दी सोहळ्याचा ध्वज उतरवतील. या वेळी राज्यपाल, मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते विखे पाटील उपस्थित असतील. त्यानंतर सभास्थळी गेल्यावर संस्थानच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थींना घरकुल वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. उत्सवाच्या सांगता दिवशी शुक्रवारी पहाटे ५.०५ वा. श्रींचे मंगलस्नान व नंतर दर्शन, ६.४५ वा. गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. १० वा. गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता मध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्री ७.३० ते १०.१५ या वेळेत प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भजनसंध्या कार्यक्रम असून रात्री १०.३० वाजता शेजारती होईल.

अधिक वाचा : दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी मंत्रिमंडळ सदस्यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू