भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज बुधवारी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश करण्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला विदर्भात खूप मोठा धक्का बसला आहे. आशिष देशमुख यांच्यासोबत राजस्थानातून जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीलाच आशिष देशमुख यांनी ई-मेलच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. राजीनामा दिल्यानंतर वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरसभेत व्यासपीठावर हजेरी लावल्याने आशिष देशमुख यांची काँग्रेस प्रवेश नक्की मानला जात होता. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मंचावर जाऊन भेट घेतली होती. 3 ऑक्टोबर रोजी त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपवला होता.
आशिष देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. बऱ्याच काळापासून ते भाजपामध्ये नाराज होते. अनेकदा त्यांनी उघडपणे भाजपाच्या धोरणांवर टीका केली होती. त्यामुळे ते लवकरच भाजपामधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. 2 ऑक्टोबरला अखेर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला.
आशिष देशमुख यांना आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यापूर्वी त्यांच्या काटोल मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे. आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख हे शरद पवार यांचे राजकीय विरोधक होते. तर राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास तयार नाही. आशिष देशमुख काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून आमदारकी मिळवली होती.
Read Also : ‘Beti Padhao, BJP se Beti ko bachao’ : Rahul Gandhi