नागपुर : गुजरात येथील दांडी येथून २ ऑक्टोबरला सुरू झालेली संविधान सन्मान यात्रा शुक्रवारी उपराजधानित पोहचली. ही यात्रा गुजरात येथून राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांचा प्रवास पूर्ण करून नागपुरात दाखल झाली आहे. संविधान सन्मान यात्रेचा दुसरा टप्पा २० ऑक्टोबरपासून नागपुरातून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज संविधान सन्मान यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींनी नागपुररातील पत्रकारांशी चर्चा करीत केंद्र आणि राज्य सरकारांवर आरोपांची सरबत्ती केली.
सध्या देशाचे राजकारण एका महत्त्वाच्या टप्प्यातून प्रवास करत आहे. लोकशाही टिकावी याकरीता प्रत्येकाला आपल्या कर्तव्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. केवळ निवडणुकांमध्ये मताचा उपयोग केल्याने आपली जबाबदारी पूर्ण झाली, असे मानणाऱ्या भारतीयांची संख्या फार मोठी आहे. प्रत्येक भारतीयाला आपली देशाप्रती असलेली जबाबदारी समजावी या उद्देशाने जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय या संघटनेने गुजरातच्या दांडी ते दिल्ली अशी संविधान सन्मान यात्रा सुरू केली आहे. सध्या यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा 20 ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान सुरू राहील याशिवाय अंतिम तिसरा टप्पा ११ नोव्हेंबर ते १० डिसेंबर पर्यंत चालणार आहे.
या यात्रेच्या माध्यमातून ही संघटना देशभरातील गाव खेड्यांचा दौरा करून तेथील शेतकऱ्यांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहे. या यात्रेच्या शेवटी ३० नोव्हेंबरला राजधानी दिल्ली येथे किसान मुक्ती यात्रा आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये देशभरातून आलेले शेतकरी आपल्या पिकाला योग्य हमी भाव मिळावा याकरीता आंदोलन करणार आहेत.
संघटनेच्या मते नैतिकता आणि देशहित वाचवण्याची ऐतिहासिक जबाबदारी ही सर्वसामान्य माणसाच्या खांद्यावर आली आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे आणली होती. परंतु केंद्र सरकारच्या धोरणावरून हे सरकार संविधानावर विश्वास ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. सामाजिक विषमता, दडपशाही, अन्याय आणि भेदभावाला खतपाणी टाकण्याच्या कामात सरकार पुढे असल्याने जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय समितीच्यावतीने संविधान सन्मान यात्रा काढावी लागल्याचे मत यात्रेत सहभागी झालेल्यांनी मांडले.
अधिक वाचा : आपत्ती व धोके निवारण सप्ताह जनजागृती कार्यक्रम उत्साहात