मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनं आधीच कंबरडे मोडलेल्या वाहनधारकांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. गाडी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना गाडीच्या किंमतीच्या तुलनेत १० टक्के जास्तीचा विमा (इन्शूरन्स प्रीमियम) भरावा लागणार आहे. कोर्टाने नुकतेच यासंदर्भात दोन निर्णय दिले असून त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार, थर्ड पार्टी इन्शूरन्स विमा बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच गाडी चालकांसाठी १५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा हा सुद्धा बंधनकारक करण्यात आला आहे.
कोर्टाच्या या दोन निर्णयामुळे वाहनधारकांना आधीच्या तुलनेत जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. जर एखाद्याने दुचाकी गाडी खरेदी केली तर त्याला पाच वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शूरन्स कव्हर खरेदी करणे बंधनकारक आहे. तसेच त्याला वार्षिक वैयक्तिक अपघात विमा सुद्धा घेणे बंधनकारक आहे. या दोन कारणांमुळे दुचाकीच्या इन्शूरन्स प्रीमियरसाठी १० टक्के रक्कम भरावी लागत आहे. ७५ हजार रुपयांच्या मोटारसायकल खरेदीवर ७ हजार ६०० रुपयांचा इन्शूरन्स भरावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहन धारकांमध्ये संताप आहे. पेट्रोलचे भाव शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत तर डिझेल ८० च्या घरात गेले आहे.
कार खरेदी केल्यास थर्ड पार्टीला इन्शूरन्स घेणे बंधनकारक आहे. तसेच वैयक्तिक अपघात विम्यासाठी ७५० रुपये जास्तीचे खर्च करावे लागणार आहेत. कार खरेदी करणाऱ्यांना २० हजारांपर्यंत रक्कम खर्च करावी लागतेय. सप्टेंबर आधी कार खरेदी केल्यानंतर १० हजार रुपये खर्च यायचा आता तो २० हजारांपर्यंत पोहोचला आहे.
अधिक वाचा : प्लास्टिक आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द – पर्यावरणमंत्री रामदास कदम