वैदर्भीय कलावंतांना चित्रपटाशी संबंधी काही समस्या किंवा माहिती हवी असल्यास प्रत्येक वेळी मुंबईला जावे लागत होते. मात्र, आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भे शाखा सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता या शाखेचे उद्घाटन सुरेश भट सभागृहात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, महापौर नंदा जिचकार, गिरीश व्यास,अनिल सोले, माजी खासदार विजय दर्डा, आशीष जयस्वाल आदी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील अनेक कलावंतांनी चित्रपट क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे, अशा विदर्भासह नागपूरच्या कलावंतांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. याशिवाय मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम, स्कीट, नृत्य, लावणी आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. चित्रपट महामंडळाचे कार्यालय सध्या सेंट्र ल अॅव्हेन्यू येथे असले तरी शहराच्या मध्यवर्ती भागात महामंडळाचे नागपूर विभागीय कार्यालय राहणार आहे.
आयोजन समितीचे प्रमुख राजू कुबेर यांनी सांगितले की, चित्रपटासंबंधी अनेक योजना असताना त्या योजनांचा लाभ विदर्भातील कलावंतांना मिळत नव्हता. नागपुरात विभागीय कार्यालय सुरू करावे, अशी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नागपुरात शाखा सुरू करण्यात येत आहे.
मराठी कला, साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन करण्यासाठी दर्जेदार मराठी चित्रपटाची माहितीपट, लघुपट व मराठी वाहिनीवरील सादर होणाऱ्या मालिकांना प्रोत्साहन, चित्रपट निर्मितीच्या सर्व विभागासाठी भारतीय व परदेशी नवीन तंत्राची आणि शोधाची माहिती उपलब्ध करून देणे व त्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातील. सभासद नोंदणी करण्यासोबतच निर्माते, कलावंत, तंत्रज्ञ, कामगार, यांचे काही आर्थिक व इतर कामकाजसंबंधी तक्रारी असल्यास त्या सोडवणे, या उद्देशाने महामंडळाचे कार्यालय नागपुरात राहणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी नागपुरात येऊन कलावंतांशी संवाद साधतील, असेही कुबेर यांनी सांगितले.
उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते भरत गणेशपुरे, वैभव तत्त्ववादी, अभिनेत्री प्रेमा किरण, वर्षां उसगावकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिक वाचा : शहरात फॅन्सी नंबर प्लेटला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांची कडक कारवाई