मुंबई : चहा स्टॅालच्या कमाईतून निधी उभा करून तो केरळ च्या पूरग्रस्तांसाठी देण्याची सहृदयता लातूरच्या अहमदपूर येथील डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या चिमुकल्यांनी दाखविली आहे. हा ५१ हजार रुपयांचा निधी आज या चिमुकल्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा शासकीय निवासस्थानी सुपूर्द केला.
केरळमधील प्रलंयकारी पुरामुळे तेथील जनतेचे जीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि विविध प्रकारच्या सहाय्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनानेही वैद्यकीय, आर्थिक आणि अनुषंगिक मदत यापूर्वीच पाठविली आहे.
केरळच्या जनतेला आपत्तीवर मात करता यावी यासाठी विविध प्रकराची मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून अहमदपूरच्या डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चहाचा स्टॅाल सुरू केला. यातून चहा विक्री करून सुमारे ५१ हजार रुपयांचा निधी जमा झाला. हा निधी विद्यालयातील हरिओम मुसळे, विश्वांभर मुलगीर, संजय केंद्रे, शुभम चित्ते या विद्यार्थ्यांनी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
यावेळी आमदार विनायक पाटील यांच्यासह, विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती यादव, शिक्षक हरिनारायण साबदे, नारायण केरले, परमेश्वर जगताप, धोंडिराम परांडे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार – डॉ. ज्ञानेश्वर मुळे