अमरावती जिल्ह्यात २४ रुग्ण कोरोनामुक्त

अमरावतीच्या जिल्हा कोविड रूग्णालयातून २४ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

corona-free-patients

नागपूर : अमरावतीच्या जिल्हा कोविड रूग्णालयातून २४ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला. मोठ्या संख्येने रूग्ण उपचारानंतर घरी परतत असल्याने ही बाब दिलासा देणारी ठरली असून, वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, परिचारिका वर्षा पागोटे यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी ब-या झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी ब-या झालेल्या रूग्णांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रूग्णसेवा देत आहेत. अमरावती महापालिका हद्दीतील २४ रुग्ण बुधवारी (दि १३) बरे होऊन परतत आहेत, याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही बातमी दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. निकम यांनी व्यक्त केली. यात ११ पुरुष व्यक्ती व १३ महिलांचा समावेश आहे. खोलापुरी गेट येथील पाच महिला व तीन पुरुष अशा आठ जणांचा समावेश आहे. हनुमाननगर येथील एका महिलेचा समावेश आहे. कंवरनगर येथील दोन महिला व एक पुरुष अशा तिघांचा समावेश आहे. नालसाबपुरा येथील दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. काटा सुप्रियानगर येथील एका पुरुषाचा समावेश आहे. गौसनगर येथील एका पुरुषाचा समावेश आहे. ताजनगर येथील तीन महिला व तीन पुरुष अशा सहा जणांचा समावेश आहे. अशा २४ व्यक्तींना बुधवारी घरी सोडण्यात आले.

आज एकूण २५ रूग्ण उपचारानंतर बरे झाले. मात्र, त्यातील एक रुग्णास डायलिसिस घेणारा असल्यामुळे त्याला दक्षता म्हणून सध्या रुग्णालयातच ठेवण्यात आले. योग्य ती काळजी घेऊन त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सांगितले. कोरोना हा योग्य उपचारांनी बरा होतो. रुग्णालयात सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचा-यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले. कुणाही नागरिकांनी कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसली की तत्काळ रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, अशी भावना या बऱ्या झालेल्या रूग्णांनी यावेळी व्यक्त केली. उपचारादरम्यान रुग्णांनी वॉर्डातील सर्व स्टाफशी चांगले सहकार्य केले. स्वत:चे मनोधैर्य कायम ठेवले. आज ते बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या काळात नागरिकांनीही दक्षतेचे पालन करावे. कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कोविड रूग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांनी केले.

कुणालाही लक्षणे दिसताच त्यांनी तत्काळ दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो. त्यामुळे माहिती लपवू नये, असे आवाहन परिचारिका वर्षा पागोटे यांनी केले.

अमरावतीत ८४ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात अद्यापपर्यंत ८४ रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२ व्यक्ती मयत आहेत. एक रुग्ण जीएमसी, नागपूर येथे रेफर करण्यात आला आहे. आतापर्यंत ४५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. २६ रुग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहेत.

Also Read- पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अपीलनंतर अमित शाह यांनी घेतला मोठा निर्णय