नागपूर : ‘साल्वेंट केमिकल’च्या नावाचे लेबल लावून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यनिर्मितीसाठी घेऊन जात असलेले स्पिरीट राज्य उत्पादनशुल्क विभागाने जप्त केले. २२०० लिटर स्पिरीटचा हा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. इचलकरंजी येथून नागपूरमार्गे गोंदिया येथे हे स्पिरीट जात होते. राज्य उत्पादनशुल्काच्या विभागाने ही कारवाई केली असून, नागपूर, गोंदिया आणि इचलकरंजी येथे छापे टाकण्यात आले. तपासात एकाहून एक धक्कादायक माहिती उघड झाल्याने यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे उत्पादनशुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाला अवैध स्पिरीटची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. विभागीय भरारी पथकाने पाळत ठेवली. वाडी येथील नागपूर-गोंदिया ट्रान्सपोर्ट येथून हा साठा गोंदियाला जाणार होता. गोंदियातील आरएम ट्रेडर्सकडे हा साठा जात होता. वाडीतील रोड ट्रान्सपोर्ट येथे प्रत्येकी २०० लिटर्सचे ३ बॅरल आढळून आले. या बॅरलवर ‘साल्वेंट केमिकल’ असे लेबल लावण्यात आले होते. पथकाने तपासणी केली असता यात स्पिरीट असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून ६०० लिटरचे स्पिरीट जप्त करण्यात आले.
विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दत्तात्रय जानराव, उपनिरीक्षक विशाल कोल्हे, एम. के. मते यांच्यासह जवान प्रकाश मानकस, राहुल सपकाळ, विनोद डोंगरे, गजानन वाकोडे, प्रशांत घावडे यांनी ही कारवाई केली.
त्रिमूर्तीनगरचा पत्ता बोगस
जगदंबा ट्रेडर्स त्रिमूर्तीनगर येथून हा साठा आल्याचे सांगण्यात आले. या स्पिरीटची वाहतूक कशी झाली, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यानुसार ज्या टेम्पोमधून या बॅरलची वाहतूक करण्यात आली त्याच्या वाहनचालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पथकाने याबाबत माहिती घेतली असता जगदंबा ट्रेडर्स त्रिमूर्तीनगर हा पत्ता बोगस असल्याचे आढळून आले. गोंदियातील आर. एम. ट्रेडर्स येथूनही स्पिरीटचे बॅरल जप्त करण्यात आले.
व्यवस्थापकाला अटक
याप्रकरणी घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट सोनबानगर, वाडी येथील विनायक रंगारी या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली आहे. येथून ८ बॅरल्स जप्त करण्यात आले. हे स्पिरीट नेमके आले कुठून, याची चौकशी केली असता या रॅकेटमध्ये गुंतलेले एक एक धागे उलगडत गेले. यापूर्वी अनेकदा अशी बेकायदेशीर वाहतूक करण्यात आल्याचे पुढे आले. वेगवेगळ्या नावांनी या स्पिरीटची वाहतूक करण्यात येत होती. वाहनचालकाला इंडस्ट्रिअल ऑइल असल्याचे सांगितले जात होते.
इचलकरंजीतही छापे
मद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरीटची तस्करी इचलकरंजी येथून करण्यात आली असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर इचलकरंजी येथील पथकाला याची माहिती देण्यात आली. आकाश पवार या नावाचा व्यक्ती हे साहित्य नागपूर-गोंदिया येथे पाठवित असल्याचे पुढे आले. पथकाने आकाश पवार यालाही अटक केली आहे. इचलकरंजी येथील ट्रान्सपोर्टवरही छापे टाकण्यात आले आहे. या अवैध व्यवसायात आणखी कोण कोण गुंतले आहे, याचा तपास सुरू आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
अवैध स्पिरीटचा हा बेकायदेशीर वापर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. गोंदिया येथील अवैध कारखान्यात या स्पिरीटचा वापर होत होता. यापूर्वी उत्पादनशुल्क विभागाने दोन कारखान्यांवर कारवाई केली. अवैध मद्यविक्रीचे रॅकेट मोठे असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे सुरू आहे. स्पिरीटचे प्रमाण थोडे जरी चुकले तर मद्याच्या पेल्यातील एक घोट विषाचा घोट बनू शकतो, असा धोका तज्ज्ञांनी वर्तविला.
मद्य बनविण्यासाठी स्पिरीटचा वापर केला जातो. अधिकृतरित्या याचा वापर करण्यासाठी साखर कारखान्यांना एम १ चा परवाना दिला जातो. तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या तपासणीत हा वापर होतो. मात्र अवैध व्यवसायात यावर कुणाचेही नियंत्रण नसते. यामुळे शासनाचा मोठा महसूलही बुडतो.
अधिक वाचा : कावासाकी निन्जाच्या धडकेत एक ठार