नागपूर : रेल्वे पोलिस दलाने कुरिअर बॉयकडून १९ लाखांचे सोने जप्त केले. दिनेशकुमार जयेशकुमार मिश्रा (वय २६, रा. सुदामगल्ली, इतवारी), असे कुरिअर बॉयचे नाव आहे.
रविवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानकावरील फलाट क्र. ३ वर १२८०९ हावडा मेल आली. या मेलमधून एकाने दिनेशकुमार याला बॅग दिली.बॅग घेऊन तो जात होता. आरपीएफचे जवान विकास शर्मा यांना दिनेशकुमार याच्यावर संशय आला. त्यांनी त्याने बॅगबाबत चौकशी केली. दागिने असल्याचे त्याने शर्मा यांना सांगितले. त्याला आरपीएफ ठाण्यात आणले. याबाबत कळताच मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा तेथे पोहोचले. बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये सोन्याचा कंठहार, सोनसाखळी, बांगड्या व अन्य दागिने आढळले.
मुंबईच्या खंडेलवाल लोजीस्टिक कुरिअर कंपनीमधून हे पार्सल आले होते. दिनेशला मेलने पार्सलविषयी माहिती मिळाल्याने त्याने पार्सल घेतले. मात्र, दागिन्यांची कोणतीही पावती मिळाली नसल्याचे त्याने सांगितले.
अधिक वाचा : मेट्रोच्या ट्रेलरने कामगारांना चिरडले