दोन्ही आरोपींनी आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नातेवाईक आहोत, (Union Minister Nitin Gadkari)असं सांगून ही फसवणूक केल्याची माहिती समोर येतेय.
डोंबिवली, 12 जून: डोंबिवलीत (Thane district’s Dombivli) फसवणुकीप्रकरणी एका बापलेकाला (Father-son duo) पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी लोकांची फसवणूक केली असून लाखो रुपयांचा गंडा लावला आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांनी आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नातेवाईक आहोत, (Union Minister Nitin Gadkari)असं सांगून ही फसवणूक केल्याची माहिती समोर येतेय.
आरोपी वडील राजन गडकरी आणि त्याचा मुलगा आनंद गडकरी (Father Rajan Gadkari and his son Anand Gadkari)यांनी स्वतःची ओळख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नातलग अशी सांगितली. हे दोन्ही आरोपी सरकारी नोकरीत भरती करु आणि स्वस्त दरात सोनं देऊ असं सांगून लोकांकडून पैसे उकळायचे. या सर्व घटना उघडकीस आल्यानंतर दोन्ही आरोपींनी डोंबिवलीतून पळ काढला. मात्र आनंदची पत्नी गीतांजली सोडून दोघंही पसार झाले. हे बापलेक मूळचे कर्नाटकातील आहेत.
हे दोघं पसार झाल्याचं गीतांजलीला माहित नव्हतं. त्यामुळे तिनं या दोघांची बेपत्ता असल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनला गेल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. आनंद आणि गीतांजली यांना चार वर्षांचा मुलगा देखील आहे. दरम्यान राजन आणि आनंद या दोघांनी माझ्या खात्यातून सर्व आर्थिक व्यवहार केल्याचं गीतांजलीनं पोलिसांना सांगितलं.
गीतांजलीनं दिलेल्या जबाबानंतर आणि फसवणुकीला बळी पडणारे तक्रारदार अतुल पाळसमकर यांच्या तक्रारीच्या आधारे स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला.
अखेर दोन पोलिस पथकांनी दोन्ही आरोपींना कर्नाटकातून पकडले असून त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कारवाईखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दोघांकडून किती पैसे उकळले याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.