युवराज सिंगचा आज क्रिकेटला अलविदा ?

नागपूर : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आज क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. युवराज सिंग मागील बराच कालावधी टीम इंडियाच्या बाहेर असून आयपीएलमध्ये ही त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. मागील काही महिन्यांपासून युवराज सिंग निवृत्तीवर विचार करत असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०११ मधील वन डे विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या विजयात युवराजचा मोलाचा वाटा राहिला आहे.

युवराज सिंगने आज मुंबईत पत्रकार परिषद बोलावली असून त्यात निवृत्ती घोषणा करण्याची शक्यता आहे. युवराज निवृत्तीनंतर आयसीसीची मान्यता असलेल्या परदेशातील टी-२० लीगमध्ये खेळणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, युवराजला कॅनडातील जीटी २० आणि आयर्लंड व हॉलंडमधील युरो टी-२० स्पर्धेत खेळण्याचे आमंत्रण मिळाले आहे. इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. काही स्पर्धांसाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन त्यात सहभागी होता येते.

इरफान पठाणनेदेखील कॅरेबियन प्रीमियर लीगसाठी आपले नाव नोंदवले होते. मात्र, इरफान सध्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळत असून बीसीसीआयकडून त्याने परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे बीसीसीआयने त्याला आपले नाव मागे घेण्याची सूचना केली आहे. युवराजबाबतही नियम तपासून पाहावे लागणार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा : MTV Beats Drums up the Entertainment Bonanza with a new show, The Top 20 Countdown