बुलडाणा: बुलडाण्यात आज आणखी एकाला करोनाची लागण झाली असून येथील करोना रुग्णांची संख्या चार झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका २३ वर्षाच्या तरुणाला करोनाची लागण झाल्याने चिंतेत भर पडली आहे.
बुलडाण्यात ‘त्या’ मृताच्या कुटुंबातील दोघांना करोना
बुलडाण्यात एका २३ वर्षाच्या तरुणाला करोनाची लागण झाली असून येथील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी सांगितलं. जिल्ह्यातील अजून ८ चाचण्यांचे रिपोर्ट येणे बाकी असून त्यातील एक रिपोर्ट हायरिस्क नमुन्याचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज सापडलेल्या रुग्णाच्या परिसराला सील करण्यात येणार असून त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबासहीत मित्रपरिवारातील लोकांचीही चाचणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज सापडलेला हा रुग्ण परदेशातून आलेला नव्हता. त्याची परदेशवारीची हिस्ट्रीही नव्हती. त्यामुळे तो नेमका कुणाकुणाच्या संपर्कात आला आणि त्यांच्या संपर्कातील कुठला व्यक्ती परदेशातून आला होता, याचीही माहिती घेण्यात येणार आहे. बुलडाण्यात या आधी करोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यातच हा नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, राज्यात मंगळवारी करोनाचे ७२ रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढलेली असतानाच आज पुन्हा राज्यात १८ नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. या १८ पैकी मुंबईत १६ आणि पुण्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३२०वर गेली आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांत करोना रुग्ण मोजण्यात चूक झाल्याने ही संख्या वाढल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Also Read- तब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव