नागपूर: जाटतरोडी मार्गाने दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणाच्या गळ्यात मंगळवारी सायंकाळी कटलेल्या पतंगाचा मांजा अडकला. त्याच वेळी काही तरुणांनी कटलेला पतंग लुटण्यासाठी हा मांजा ओढला व यात तरुणाचा गळा कापल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रणय ठाकरे (२०) रा. मानेवाडा रोड असे दगावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सायंकाळी पाचच्या सुमारास त्याच्या दुचाकीवर सरदार पटेल चौकातून मेडिकलच्या दिशेने जात होता. त्याच्या गळ्यात मांजा अडकला. त्याने लगेच वाहन थांबवले. हेल्मेट काढण्याचा प्रयत्नात तो असतानाच काहींच्या हातात हा मांजा आल्यानेत्यांनी जोरात तो ओढला. त्यात या तरुणाचा गळा कापला व तो खाली कोसळला.
त्याच्या गळ्यातून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाल्याने पोलीस हवालदार प्रदीप गायकवाड यांनी त्याला मेडिकलला नेले. परंतु डॉक्टरांनी प्रणयला तपासले असता त्याचा आधीच मृत्यू झाला होता. ही माहिती पोलिसांनी प्रणयच्या वडिलांना दिली. मुलाला मृतावस्थेत पाहून सगळ्यांना अश्रू अनावर झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मांजा नव्हे सुराच नायलॉन मांजावर कायद्याने बंदी आहे. त्यानंतरही नागपूरसह इतरत्र सर्रास या मांजाची विक्री होत आहे. त्यातच काही बेजबाबदार व्यक्ती सर्रास रस्त्याच्या कडेवर अथवा गर्दीच्या ठिकाणी पतंग उडवत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या गळ्यात मांजा अडकून अपघातही वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या मांजा विक्रेत्यांसह रस्त्याच्या कडेवर पतंग उडवणाऱ्यांवर काय कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुसऱ्या घटनेत तरुण जखमी मानेवाडा परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचाही पतंगाच्या मांजामुळे हात कापला. तातडीने त्याने जवळच्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतला. संक्रांतीचा सण दोन दिवसांवर असताना मांजाने जखमी होणारे वाढत आहेत. ऐन संक्रांतीत तरी खबरदारी म्हणून पोलीस विशेष अभियान राबवणार काय, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
नवीन वर्षांतला तिसरा बळी उपराजधानीत गेल्या १० दिवसांत पतंगाच्या नादामुळे गेलेला हा तिसरा बळी आहे. दाभा परिसरात सात वर्षीय मुलगा वंश विकास तिरपुडे हा कटलेली पतंग पकडण्याच्या नादात कारखाली चिरडला गेला. ६ जानेवारीला एंटा विनोद सोळंकी हा १२ वर्षीय मुलगा धावत्या रेल्वेखाली आला आणि आता प्रणय ठाकरे याचा बळी गेला.