तुम्ही होऊ शकता सेक्सटाॅर्शनची शिकार; चार महिन्यांत १५० नागरिक अडकले जाळ्यात

Sextortion porn sex

मी शहरातील एका नामांकित कंपनीत नोकरी करतो. सोशल साईटवर ऑनलाईन मित्र जमवणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे मला आवडते. एेका दिवशी मला एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ काॅल आला. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी त्याला प्रतिसाद दिला. समोरून एक तरुणी माझ्यासोबत बोलत होती. आता दररोज ती काॅल करू करत होती. माझ्यासोबत तीने जवळीक निर्माण केली. काही दिवसानंतर व्हिडीओ काॅलवर बोलत असताना ती शरिराचे न्यूड प्रदर्शन करू लागली. सुरूवातील मला देखील ते चांगले वाटू लागले. तिने आपल्या जाळ्यात खेचत मला देखील न्यूड होण्यास भाग पाडले. ती सांगेल तसे मी करत होते. अचानक माझ्या मोबाईलवर माझाच न्यूड व्हिडीओ येऊन धडकला.

समोरील व्यक्ती हा व्हिडीअो माझे नातेवाईक मित्र-मैत्रिणीला पाठवून देण्याची धमकी देत पैशाची मागणी करत होता.मी काही पैसे त्याला दिले देखील. परंतू त्याची मागणी सतत वाढू लागली होती. सतत होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी मी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन झालेली हकीकत सांगितली त्यावेळी मला समजले की, मी सायबर गुन्हेगारांच्या सेक्सटाॅर्शन ट्रॅपमध्ये अडकलो आहे. असे विजय (नाव बदलले) सांगत होता. त्यामुळे योग्य वेळी योग्य काळजी घेतली नाही तर पुढील नंबर तुमचा देखील असू शकतो.

नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून आर्थिक गंडा घालण्यासाठी सायबर चोरट्यांनी हनीट्रॅप नंतर आता सेक्सटाॅर्शन ट्रॅपची सुरूवात केली आहे. चालू वर्षातील चार महिन्यात दिडशे पेक्षा अधिकजण पुण्यात सेक्सटाॅर्शनची शिकार झाले आहेत. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे सुशिक्षित पुरुषांचे प्रमाण यामध्ये अधिक असल्याचे समोर आले आहे. सेक्सटार्शनची शिकार झाल्यानंतर देखील बदनामी होईल या भितीपोटी अनेकजण तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहीत. सोशल मिडीयावर आपण कोणाशी बोलतो, संवाद साधतो त्यातील कोणाचा काय उद्देश आहे. हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. जितक हे आभासी जग मोठ आर्कषक व जलद आहे, तितकच ते लवचिक, धोकादायकही आहे.

काय आहे सेक्सटाॅर्शन?

सोशल साईटवरून तुमच्यासोबत तरुण किंवा तरुणी ओळख निर्माण करते. मात्र प्रत्यक्षात तो सायबर गुन्हेगार असतो. अोळख झाल्यानंतर व्हिडीओ काॅल केला जातो. त्यामध्ये समोरील तरुणी अंगावरील कपडे काढून शरिराचे नग्न प्रदर्शन करते. सुरुवातीला तुम्ही प्रतिसाद देण्याचे टाळता. मात्र काही कालावधीनंतर तरुणी समोरील व्यक्तीला आपल्या जाळ्यात खेचते. तरुणीने ऑफर केल्यानंतर संबंधीत व्यक्ती देखील व्हिडीओ काॅलच्यावेळी नग्न होते.

परंतू ज्या व्यक्तीला काॅल केला आहे, त्याच्या व्हिडीओ काॅलचे रेकाॅर्डींग होत असते. अगोदरच सायबर चोरट्याने त्याच्या खात्यात प्रवेश करून नातेवाईक व मित्र मैत्रिणी शोधून ठेवलेल्या असतात. रेकाॅर्डींग केलेला व्हिडीओ काही ओळखीच्या व्यक्तीला पाठवून दिले जातात. त्यानंतर व्यक्तीकडे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मोठ्या पैशाची मागणी केली जाते. बदनामी होण्याच्या भितीपोटी अनेकजण जाळ्यात अडकून पैसे देतात. एकप्रकारे ब्लॅकमेल करून खंडणी उकळली जाते.

या विषयासंदर्भात बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबरचे दगडू हाके म्हणाले, “सोशल साईटवर अनोळखी व्यक्तीसोबत अती मोकळे होणे टाळले पाहिजे. समोरच्या व्यक्तीचा परिचय असल्याशिवाय मैत्री करणे धोकायदायक ठरु शकते. चालू वर्षात आत्तापर्यंत 150 पेक्षा अधिक अशाप्रकारचे तक्रार अर्ज सायबर पोलिस ठाण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदरी घेण्याची गरज आहे.

पहा सायबर तज्ञ अविराज मराठे काय सांगतात?

– अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना योग्य ती काळजी घ्या.

– सोशल साईट्स व अॅपवरील प्रायव्हसी सेटींग तपासा

– अनावश्यक फोटो, व्हिडीओ पोस्ट करणे टाळा

– विनाकारण लगट करणाऱ्यांना दूर ठेवा.

– स्तूती करणारा प्रत्येक माणूस मित्र असतोच असे नाही

– सोशल मिडीयावर फोटो, व्हिडीओ, वैयक्तीस माहिती तरुणींनी सर्वांना दिसेल अशी ठेवू नये.

– सोशल मडियावरून ओळख झाल्यानंतर दाखविलेल्य आमिषाला बळी पडू नका.

– अनोळखी व्यकींचे फोन व व्हिडीओ काॅल्सना टाळा.

– संकटाचा आभास होताच सायबर पोलिसांशी संपर्क साधा.