28 वर्षीय तरुणीचा खून, क्राईम पेट्रोलमधील घटनांचा आधार घेत करत होते पोलिसांची दिशाभूल

28 वर्षीय तरुणीचा खून, क्राईम पेट्रोलमधील घटनांचा आधार घेत करत होते पोलिसांची दिशाभूल

यवतमाळ : यवतमाळमध्ये 28 वर्षीय तरुणीची आत्महत्या नसून खून च असल्याचं स्पष्ट झालं आहे. पांढरकवडा पोलिसांनी अवघ्या 72 तासात या प्रकरणाचा छडा लावत वडील, भाऊ यांच्यासह एका नातेवाईकाला अटक केली. विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या हातावर चिठ्ठी आढळल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोलमधील घटनांचा आधार घेत महिलेचे कुटुंबीय वारंवार पोलिसांची दिशाभूल करत होते. परंतु पोलिसांनी त्यांचं बिंग फोडलंच.

माहेरी आलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला                                                                                   यवतमाळ जिल्ह्यातील केळापुर तालुक्यातील पेंढरी शेत शिवारातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. कारेगावमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय रेखा राम शेडमाकेचा मृतदेह होता. गेल्या रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

रेखा शेडमाके ही मूळ पेंढरी येथील असून तिचा विवाह कारेगाव (बंडल) येथील राम शेडमाके यांच्यासोबत झाला होता. काही दिवसांपूर्वीच रेखा आपल्या माहेरी पेंढरी येथे आली होती. रविवार 11 एप्रिल रोजी पेंढरी येथील कवडू करपते यांच्या शेतातील विहिरीत रेखा शेडमाके हिचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती गावकऱ्यांनी पांढरकवडा पोलिसांना दिली. पोलीस जमादारांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रेखाचा मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा तपास करताना पोलीसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली.

डाव्या हातातील चिठ्ठीमुळे आत्महत्येचा भास                                                                                  रेखाच्या डाव्या हाताला एका कापडी पिशवीत बांधलेली एक चिठ्ठी आणि जिओ कंपनीचे सीमकार्ड मिळाले होते. गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पाण्यात टाकल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानुसार पोलीस हवालदार राहुल खंडागळे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन पंढरपूर येथे तक्रार देऊन कलम 302 201 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी पेंढरी शेत शिवारात सर्च मोहीम सुरु केली. विहिरीतील संपूर्ण पाणी मोटर पंपाच्या सहाय्याने उपसण्यात आले. रेखाच्या मृतदेहासोबत मिळालेल्या चिठ्ठीतील संशयित मुकेश उर्फ देवेंद्र कनाके यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तसेच रेखाची आई आणि नातेवाईकांकडे सखोल चौकशी करण्यात आली, परंतु तपासाला कुठलीही दिशा मिळत नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांचा आधार घेऊन महिलेचा खून हा सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी झाला असावा, असा संशय पोलिसांना आला.

मालिका-चित्रपटांच्या उदाहरणांनी पोलिसांची दिशाभूल                                                                    त्या आधारावर तपास करुन गुन्ह्यात संशयित असलेल्या रेखाच्या नातलगांना चौकशीसाठी बोलवले. परंतु नातलगही दृश्यम चित्रपट आणि क्राईम पेट्रोलमधील घटनेचा आधार घेऊन वारंवार दिशाभूल करत होते. त्यामुळे हत्येचं गूढ उलगडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं.

वडील, भाऊ, मेहुणा ताब्यात                                                                                            सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी ही हत्या झाल्याची खात्री पटल्याने संशयित म्हणून रेखाचे वडील विलास मरापे, भाऊ हिरामण मरापे, मेहुणा सुभाष मडावी यांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन 16 एप्रिल रोजी न्यायालयाकडून अधिक तपासासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचारपूस केली. तेव्हा हा गुन्हा आपणच केल्याची कबुली आरोपींनी दिली.

गळा आवळून खून करुन विहिरीत ढकललं                                                                                  तिन्ही आरोपींनी संगनमत करुन त्यांची सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी ही हत्या केली होती. नऊ एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी विलास मरापे यांनी रेखाला पेंढरी शेत शिवारात नेले. सोबत आणलेल्या दोरीने गळा आवळून तिला ठार मारले. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी तिच्या हाताला बांधून तिला विहिरीत ढकलून दिले. पुरावे नष्ट करत खुनाची घटना घडलीच नाही, अशी नाट्यमय परिस्थिती त्यांनी निर्माण केली. दोन दिवस ते आपले नियमित काम करत राहिले. परंतु पांढरकवडा पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून सदर खुनाचा 72 तासात छडा लावला.