नागपूर: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून पाठिंब्याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. सेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं तरी मुख्यमंत्री कोण असा प्रश्न असणार आहे. त्यातही शिवसेना ने भाजपसोबत जी भूमिका घेतली ती काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही नेत्याला आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून मान्यता मिळणं कठिण आहे. तर सेनेकडून वरिष्ठ नेते सुभाष देसाई किंवा गटनेते एकनाथ शिंदे यांची नावे पुढे येऊ शकतात.
शिवसेनेनं याआधीच सांगितलं आहे की, त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार आहेत. तसेच पक्षातील अनेकांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं. त्यांच्याशिवाय इतर कोणाचं नाव इतर नेते स्वीकारतील का असा प्रश्न आहे. याला कारणही तसंच आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्याशिवाय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचं नावही चर्चेत आहे. मात्र पहिल्यांदाच निवडणूक लढवलेले आदित्य 29 वर्षांचे आहेत. त्यांच्या नावावर काँग्रेस-राष्ट्रवादी शिक्कामोर्तब करण्याची शक्यता कमी आहे.
काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हण, राष्ट्रवादीचे दोन माजी उप मुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ हेसुद्धा विधानसभेत आहेत. आघाडीच्या सरकारमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांसोबत यांनाही काम करावं लागेल. अशा वेळी आदित्य किंवा इतर नावांऐवजी उद्धव यांच्या नावालाच जास्त प्राधान्य दिलं जाईल.
उद्धव यांच्या नावानंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्या नावाची. एकनाथ शिंदे यांची विधानसभा आणि विधान परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुभाष देसाही हे वरिष्ठ नेते आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत नव्या सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीमध्येही ते होते. त्यामुळे सुभाष देसाई यांचेही नाव पुढे येत आहे.