नागपूर- गणेशोत्सव नागपुरात धुमधडाक्यात साजरा झाला…. गणेशोत्सव संपून आता दोन महिने झाले. मात्र सर्वांत उंच गणपती म्हणून ओळख असलेल्या हिलटॉप येथील मंडळाचा मांडव अद्यापही काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर तो अद्यापही कायम आहे. यासंदर्भात परिसरातील काही नागरिकांनी तक्रारीचा सूर व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रशासनाकडून मंडळाला रितसर परवानगी घ्यावी लागते. महापालिकेच्या कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी गणेश मंडळांना मार्गदर्शन सूचना दिल्या जातात. कोणकोणत्या बाबींचे पालन व्हावे, याचे लेखी स्वरूपात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले जाते. गणेशोत्सव संपल्यानंतर ४८ तासांत मांडव काढून ती जागा पूर्ववत करणे मंडळाला बंधनकारक असते. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, हा यामागील उद्देश असतो. उच्च न्यायालयानेही यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. परंतु महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने नियमांचे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दोन वर्षांपासून मांडव कायम
हिलटॉप येथील मुंजे बाबा ले-आऊट परिसरात गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्वांत उंच मूर्ती म्हणून हिलटॉपच्या गणेशाची ओळख आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त या गणेशाच्या दर्शनासाठी येतात. गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या या मंडळाने नियमांचेही पालन करावे, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली. तब्बल दोन वर्षांपासून हा मांडव काढला नसल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली. यासंदर्भात आमदार प्रकाश गजभिये यांच्याशी संपर्क साधला असता, लवकरच मांडव काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मांडव काढण्यासाठी कोलकाता येथून लोक येणार असल्याचे त्यांनी सांगितले.