नागपूर : वाहन चालविणारी अथवा वाहनात बसलेली व्यक्ती मास्क लावून नसेल तर पोलीस लगेच त्याच्याकडून २०० रुपयांचे चालान फाडतात. परंतु याच सिग्नलवर भीक मागणारी लहान मुले, महिला या कुठलेही सुरक्षितता न बाळगता वाहनांना, चालकांना हात लावून भीक मागतात. शहरातील अनेक चौकांमध्ये हे दृश्य बघायला मिळते. चालान भरणारे वाहन चालक सुद्धा पोलिसांना त्यांच्याकडे बोट दाखवून यांचे काय, अशी विचारणा करतात. पण वाहतूक पोलीस सुद्धा हतबलतेने त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आणि पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईच्या भीतीपोटी प्रत्येकजण तोंडाला मास्क लावून फिरत आहे. पायी चालणाऱ्यांनी मास्क न वापरल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. पण शहरातील काही सिग्नलवर भटकंती करणारी काही लोकं टोळीने दिसून येतात. यातील पुरुष मंडळी कुठले तरी सामान चौकात विकत असतात. महिला व मुले सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकांकडून भीक मागत असतात. त्यांची लहान लहान मुले सिग्नल थांबल्याबरोबर वाहनांच्या जवळ येतात. गाड्यांना हात लावतात. दुचाकीवर असलेल्यांना सुद्धा हात लावून पैशाची मागणी करतात. हे लोकं समूहाने राहतात. कोरोनासारखी महामारी असतानाही कुणाच्याही तोंडाला मास्क नसतो, बिनधास्तपणे रस्त्यावर हुंदाडत असतात. कोरोनापासून बचावण्यासाठी प्रशासनाने काही सुरक्षेचे मापदंड घातले आहे. पण हे भटकंती करणारे त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही लोकं कोरोनाचे वाहक ठरू शकतात, अशी भीती नागरिकांना आहे. या लोकांना आवर घाला, अशी भावना नागरिकांची आहे.
भीक मागणाऱ्यांविरुद्ध कारवाई थांबली
महिला व बाल कल्याण विभाग, पोलीस विभागातील सामाजिक सुरक्षा पथक हे संयुक्तपणे भीक मागणाऱ्यांविरु द्ध कारवाई करते. पण या विभागाकडून कारवाईच बंद आहे. शहरातील आरबीआय चौक, अग्रसेन चौक, आकाशवाणी चौक, पंचशील चौक, छत्रपती चौक, तुकडोजी चौक अशा अनेक चौकात लहान मुले, महिला भीक मागतांना दिसत आहे. नागरिक त्यांच्यामुळे भयभीत आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात प्रशासनाकडून कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.