राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढला आहे. अशात आता आणखी आठवडाभर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट राहणार आहे. पुढच्या ४-५ दिवसांत उष्णतादेखील वाढेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं वातावरण तयार होत आहे. यात उष्णताही वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे.
आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि गाराही पडण्य़ाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ९ मेपर्यंत राज्यभर असंच वातावरण असणार आहे. सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
आठवडाभर कसं असेल हवामान?
उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा – या भागामध्ये आजपासून ९ मेपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र – उत्तर मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तर उद्यापासून ९ मेपर्यंत सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र – आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून उद्या मात्र सर्वच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर ८ आणि ९ तारखेला काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा – मराठवाड्यामध्येही संपूर्ण आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पूर्व विदर्भ – पूर्व विदर्भात आजपासून ९ मेपर्यंत पावसाचं वातावरण असणार आहे. अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटांसह गारांची शक्यता असणार आहे.
पश्चिम विदर्भ – पश्चिम विदर्भातही संपूर्ण आठवडाभर पावसाचं वातावरण असणार आहे.
दरम्यान, मे महिन्यात उन्हाचा तडाखा, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस असंच हवामान असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, तर नागरिकांनीही हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आणखी आठवडाभर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट असणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, लातूर आणि उस्मानाबादच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली असून काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि विजांचा गडगडाट होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.