तोतलाडोह धरणाची पातळी कमालीची खालावल्याने नागपूरवर जलसंकटाचे ढग दाटले

Totladoh dam

नागपूर : नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाची पातळी कमालीची खालावल्याने नागपूरवर जलसंकटाचे ढग दाटले आहेत. ही पातळी २१ ऑगस्ट २०१४मध्ये ७०८ दशलक्ष घनमीटर होती. २०१५मध्ये ९५६, २०१६मध्ये ८१७ दशलक्ष घनमीटर एवढी होती. मात्र, यावर्षी याच तारखेला ही पातळी केवळ ८२.३३ दशलक्ष घनमीटर आहे. शहराला भेडसावत असलेल्या भीषण जलसंकटाचे वास्तव मांडण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. एकूण क्षमतेपेक्षा केवळ ८ टक्केच धरण भरले.

१६ ऑगस्ट रोजी चौराई धरणाचे पाणी काही प्रमाणात तोतलाडोहमध्ये सोडण्यात आले. त्यामुळे १६ ऑगस्ट रोजी केवळ २.३२ टक्केच असणारा जलसाठा आता ८.१० टक्क्यांवर आला. ८ टक्के धरण भरले असले तरी शहराची पाण्याची गरज लक्षात घेता नागपूरकरांवर भीषण जलसंकटाचे सावट उभे ठाकले आहे.

राज्याच्या विविध भागात पावसाने कहर केला असला तरी नागपूर जिल्ह्यात मात्र अद्यापही धरणांच्या पातळीत वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणांत केवळ ८.१० टक्केच पाणी आहे. इतर धरणांच्या पातळीतही समाधानकारक वाढ झाली नसल्याने हे चित्र चिंता व्यक्त करणारे आहे. गेल्या पाच वर्षांतील जिल्ह्यातील धरणसाठ्याची आकडेवारी बघितली असता यंदा कमालीची घट झाली असल्याचे चित्र आहे.

कशी भागणार तहान?

मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे पाणी तोतलाडोह धरणात सोडण्यात यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेश सरकारसोबत चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यात ही चर्चा झाली. मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मध्यप्रदेश सरकारने चौराई धरणाचे पाणी सोडण्यासाठी हिरवी झेंडी दाखविली. मात्र, शहराची तहान भागवू शकेल ऐवढे पाणी चौराई धरणातून मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे. नागपूरची तहान भागविण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.