नागपूर : पोलिसांना ‘मोस्ट वॉण्टेड’ असलेला उपराजधानीतील कुख्यात चेनस्नॅचर स्वरुप नरेश लोखंडे (वय २६, रा. श्रीनगर, अजनी) अखेर अजनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अजनी पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून त्याला वाडी भागात अटक केली. त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी गजाआड केले आहे. गुन्हे शाखा पोलिसही त्याच्या मागावर होते, असे कळते. चौकशीदरम्यान अजनी पोलिसांनी स्वरुप याच्याकडून चेनस्नॅचिंग व घरफोडीचे तब्बल १३ गुन्हे उघडकीस आणले. भारत ऊर्फ बंटी उदयभान गलबले (वय ३५, बँक कॉलनी, नरसाळा रोड), असे स्वरुपच्या साथीदाराचे नाव आहे. भारत याचे आधी ज्वेलर्सचे दुकान होते. आता त्याची मोबाइल शॉपी आहे. स्वरुपने दिलेल्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्याचे काम त्याच्याकडे आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी मंगळवारी दिली.
गत काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लुटारुंच्या अटकेचे निर्देश सर्वच वरिष्ठ पोलिसांना दिले. गुन्हे शाखा पोलिसही स्वरुप याच्यासह शहरातील सोनसाखळी लुटारुंच्या शोधात होते. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अजनी पोलिसांनाही स्वरुप हवा होता. स्वरुप हा वाडीतील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहात असल्याची माहिती अजनी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्या साथीदारालाही अटक केली. त्याच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह पावणेचार लाखांचा ऐवज जप्त केला. स्वरुप याच्याविरुद्ध चेनस्नॅचिंग, घरफोडीसह तब्बल ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
संसारासाठी जमा केलेले साहित्यही जप्त
स्वरुप याचे अजनी भागात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. तो तिच्याशी लग्न करणार होता. १५ जूनला त्याने मुलीचे अपहरण केले. तिच्यासोबत तो वाडीतील फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होता. चार दिवसांपूर्वीच मुलगी घरी परतली होती. लग्नानंतर संसारासाठी लागणारे साहित्य त्याने खरेदी केले. चोरीचे दागिने विकून त्याने सिलेंडर, शेगडी, एलसीडी, फ्रिज, कुलर, मिक्सर खरेदी केले. हे साहित्यही पोलिसांनी जप्त केले.
पोलिस ठाण्यातून झाला होता पसार
चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी स्वरुप याला २२ ऑगस्ट २०१३ ला अटक केली होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलिसांनी त्याला चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढले. याचदरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन स्वरुप हा पोलिस स्टेशनमधून पसार झाला होता. हे प्रकरण एका सहायक पोलिस निरीक्षकावर चांगलेच शेकले होते. स्वरुप फरार झाल्याप्रकरणात तत्कालीन पोलिस आयुक्तांनी या एपीआयला निलंबित केले होते. हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
अधिक वाचा : नागपूर : दारु पिण्यास पैसे न देणाऱ्याची हत्या करणाऱ्या तिघांवरील आरोप सिद्ध ; तिघांना जन्मठेप