नागपूर : खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे, यासाठी शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर ३ हजार किलो खिचडी एकाच भांड्यात तयार करण्याचा विश्वविक्रम करणार आहेत, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी दिली.
१४ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता खिचडी बनवणे सुरू होईल. दुपारी ३ वाजता उदघाटन होईल. खिचडीसाठी ५०० किलो डाळ, ५०० किलो तांदूळ, ५० किलो तूप, ५० किलो तेल, ३०० किलो भाजी, गाजर ही सामग्री वापरण्यात येईल. खिचडी बनवण्यासाठी ३,१२८ किलो क्षमतेची आणि १० फुटांची कढई कोल्हापूरचे इंजिनिअर नीलेश पै यांनी तयार केली आहे. तयार झालेली खिचडी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० दरम्यान नागरिकांना वितरित करण्यात येईल.
विक्रमासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड यांचे संमतीपत्र आले आहे. हा विक्रम पाहण्यासाठी १५ शाळांमधील विद्यार्थी, नागरिक हजेरी लावणार आहेत. डिसेंबर महिन्यात जळगाव येथे २५०० किलो वांग्याचे भरीत तयार करण्याचा रेकॉर्डही विष्णू मनोहर करणार आहेत.
अधिक वाचा : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: पहिल्याच दिवशी १ हजार रुग्णांना लाभ