प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: पहिल्याच दिवशी १ हजार रुग्णांना लाभ

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (PMJAY ) सुरू होऊन अवघे २४ तास उलटत नाही तोच १ हजारांहून अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले होते.

छत्तीसगड, हरयाणा, झारखंड, आसाम आणि मध्य प्रदेशमधील रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी झारखंडची राजधानी रांचीमध्ये या योजनेचे उद्धाटन केले होते. यानंतर काही रुग्णांना ‘गोल्ड कार्ड’ वाटप केले. ही योजना लागू झाल्यानंतर जमशेदपूरच्या सिंहभूम सदर हॉस्पिटलमध्ये पूनम महतो या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. व ती पहिली लाभधारक ठरली. झारखंडमध्ये योजना लागू झाल्यानंतर काही तासांत रांची इंस्टि्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (रिम्स) मध्ये चार रुग्ण दाखल झाले. या योजनेंतर्गत १० कोटींहून अधिक कुटुंबांना ५ लाखांपर्यंतचे आरोग्य विमा कवच मिळणार आहे.

देशातील ९८ टक्के लाभदारकांची यादी आधीच तयार झाली आहे. याअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य पथक (एनएचए) कडून त्यांना पत्र पाठवण्यात येत आहेत. या पत्रात क्यूआर कोड आणि कुटुंबाची माहिती लिखित आहे. त्यानुसार, रुग्णांना सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणार आहे. आम्ही आतापर्यंत ४० लाख पत्र पाठवले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही योजना ३० राज्यातील ४४५ हून अधिक जिल्ह्यात एकाचवेळी सुरू करण्यात आली आहे. १० हजार सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी २.६५ लाख बेडची सुविधा उपलब्ध होणार आहे.

अधिक वाचा : पाच राज्यांनी केला ‘आयुष्मान भारत’ योजनेला विरोध