नागपूर – लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन विदर्भवाद्यांनी विदर्भ निर्माण महामंडळातर्फे पहिली यादी जाहीर केली आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्यासह ६ उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. त्यामुळे नागपूरच्या निवडणुकीत चौरंगी लढत बघायला मिळणार आहे.
विदर्भातील कास्तकार शिक्षित युवा बेरोजगारांसह समाजातील प्रत्येक घटकाचा सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे. विदर्भाच्या ११ जिल्ह्यात आपले उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा विदर्भवाद्यांनी पूर्वीच केली होती. त्याप्रमाणे विदर्भवाद्यांनी विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे देविदास लांजेवार निवडणूक लढवतील. याशिवाय रामटेक मतदारसंघातून राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे चंद्रभान रामटेके चंद्रपूर मतदारसंघातून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ मडावी वर्धा लोकसभा मतदार संघातून लोकजागर पार्टीचे ज्ञानेश्वर वाकुडकर आणि अमरावती मतदारसंघातून नरेंद्र कठाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बेरोजगारीच्या समस्येवर आणि विदर्भ विकासाच्या मुद्द्यांवर सर्व पक्ष तकलादू आणि कचखाऊ धोरण अवलंबत असल्याने विदर्भाचा विकास कोसो दूर गेला. स्वार्थी, लाभार्थी आणि विश्वासघाती पक्षनेत्यांमुळेसुद्धा विदर्भ विकासाच्या मार्गावर बराच मागे राहिल्याने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विदर्भ निर्माण महामंच लोकसभा आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.
अधिक वाचा : मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांची दीक्षाभूमीला भेट