नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या मंत्रिमंडळाचा आजच विस्तार होणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यावेळी महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील नेत्यांना झुकतं माप देण्यात येणार आहे. एकूण 43 मंत्री आज शपथ घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. (Union Cabinet expansion to be held at 6 pm today)
गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मधल्या काळात शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेत मंत्रिपदाचे राजीनामे दिले. त्यामुळे मंत्रिपदे रिक्त झाली आहेत. शिवाय लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनामुळेही एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे हा विस्तार होत आहे. त्यात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, हिना गावित आणि कपिल पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे भाजपला मित्रपक्ष उरला नाही. परिणामी भाजपसमोर तीन पक्षाचं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपला मजबूत करून पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राला झुकते माप देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.
43 नेत्यांचा शपथविधी
आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहे, ही संख्या वाढून 81 होणार आहे.
शपथविधी पूर्वी चार मंत्र्यांचे राजीनामे
दरम्यान, आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीपूर्वीच चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आले आहेत. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक, सदानंद गौडा, संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांचा समावेश आहे. नव्या चेहऱ्यांबद्दलही तेवढीच उत्सुकता आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातसह जवळपास सहा राज्यातल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी चर्चा आहे.
दानवेंना डच्चू?
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना डच्चू मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातून चार नेत्यांचा नव्या विस्तारात समावेश करण्यात येणार असल्याने दानवेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाण्याचं वृत्त आहे.
मोदींच्या निवासस्थानी बैठक हे नेते उपस्थित
सर्वानंद सोनोवाल
ज्योतिरादित्य सिंधिया
अनुप्रिया पटेल
पशुपती पारस
मीनाक्षी लेखी
अजय भट्ट
शोभा करदंलाजे
नारायण राणे
भागवत कराड
हिना गावित
प्रीतम मुंडे
अजय मिश्र
आरसीपी सिंह
भूपेंद्र यादव
कपिल पाटिल
बीएल वर्मा
अश्ववनी वैष्णव (ओडिशा)
शांतनु ठाकूर(बंगाल) (Union Cabinet expansion to be held at 6 pm today)