उमरखेड : काही दिवसांपूर्वी धानोरा (सा) येथील वृध्द कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता मुंबईवरून आलेली आणखी एक महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. नागापूर (प) ता. उमरखेड येथे मुंबईवरून आलेली महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25 असून सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 124 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहे. यापैकी 99 जण बरे होऊन घरीसुद्धा गेले आहेत.
नव्याने पॉझिटिव्ह आलेली ही महिला संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती होती, मात्र रात्री तिला वैद्यकिय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले. तिच्या परिवारातील 19 लोकसुद्धा संस्थात्मक विलागीकरण कक्षात भरती होते, मात्र आता त्यांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे किंवा इतर रेड झोनमधून जिल्ह्यात आलेल्या लोकांनी पुढील 14 दिवस स्थानिक लोकांच्या संपर्कात येऊ नये. त्यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी अत्यंत जबाबदारीने आणि सक्तीने गृह विलागिकरणातच राहावे. सर्व नागरिकांनी आपल्या घरातील 65 वर्षाच्या वरील व्यक्ति आणि 10 वर्षाखालील मुलांची काळजी घ्यावी. सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत जिल्ह्यात कुठेही फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या सूचनांचे सर्वांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.
तालुक्यात अनेक गावांमध्ये पुण्या, मुंबईसारख्या ठिकाणावरून शेकडो मजूर गावांकडे परतले असतांना, त्यांना व्यवस्थित संस्थात्मक विलीनीकरण कक्षामध्ये ठेवण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून होत असलेला ढिसाळपणा होत असल्याचे निदर्शनाच आले आहे. आता बाहेरगावाहून आलेल्या मजुरांना योग्यरीत्या विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची आरोग्यविषयक व उपजिवित्वात्मक योग्य ती काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Also Read- अडचणी असल्यास विलगीकरण केंद्र प्रमुखांना संपर्क करा! महापौर संदीप जोशी यांचे आवाहन