मुंबई : मुंबईतील कलानगर, वांद्रे परिसरात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करणारे बॅनर शिवसैनिकांकडून लावण्यात आले होते. आता या बॅनरविरोधात कारवाई करण्यात आली आहे. बृहनमुंबई महानगरपालिकेच्यावतीने ही बॅनर हटवण्यात आली आहेत. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर अशा आशयाची बॅनर लावण्यात आली होती.
दरम्यान, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘महाशिवआघाडी’त सत्तेच्या वाटाघाटींसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काल रात्री पत्रकार परिषद आटोपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यात वांद्रेतल्या हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेचा अहवाल अहमद पटेल सोनिया गांधींना देणार आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेच्या दिशेनं काँग्रेसनं एक पाऊल पुढं टाकल्याचं चित्र आहे. यापूर्वी मिलिंद नार्वेकरांनी अहमद पटेलांशी चर्चा केली होती. तर उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा केली होती.