मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर उदभवलेली एकंदर परिस्थिती पाहता उच्च, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केली होती. अंतिम वर्षाच्या अंतिम टप्प्यातील परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषआ केली होती. पण, आता या निर्णयात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला गेल्याची माहिती सामंत यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या मनातील शंका आणि चांगल्या यंत्रणांसाठीही त्यांची मागणी विचाराधीन असल्याचं ते म्हणाले. अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा या १ जुलै ते ३० जुलै या काळात घ्याव्यात असे आदेश युजीसीकडून देण्यात आले होते. त्यानुसारच परीक्षा घेण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात आले होते.
सामंत यांच्या या निर्णयांनंतर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं आणि तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरली. ज्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून एक पत्र लिहिण्यात आलं आहे. ज्यामध्ये त्यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.
संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आम्हाला अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा घेणं शक्य होणार नाही. असा निर्णय घेतलाच तर, कोरोनाची वाढती संख्या पाहता विद्यार्थ्यांपुढे आणखी एक संकट असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर असणारं दडपण, ताण पाहता परीक्षा रद्द करण्यात यावी अशी विचारणा युजीसीकडे केल्याची माहिती सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.
शिवाय विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, अशा प्रकारती गुणवत्ता प्रक्रिया अंमलात आणावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असू असंही ते म्हणाले. राज्यातील जवळपास १० लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता अंतिम परीक्षा न घेता त्यांना विद्यापीठ आयोगाच्या अनुदानाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ग्रेड प्रदान करण्याच्या पर्यायाला युजीसीनं मान्यता द्यावी असं विनंतीपर पत्र सामंत यांनी लिहिलं.
तेव्हा आता राज्य शासन युजीसीच्या उत्तराच्या प्रतिक्षेत असल्याचं स्पष्ट करत सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली.
सीईटीच्या परीक्षांसाठी महत्त्वाचे निर्णय
– जिल्हा स्तरावर होणारी ही परीक्षा आता तालुका स्तरावर होणार आहे
– तालुका स्तरावर परीक्षा घेताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात येणार आहेत
– ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाठी दुसऱ्या शहराची निवड केली होती, पण लॉकडाऊनमुळं ते आपल्या घरी आहेत अशा विद्यार्थांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्यात येणार आहे.
– लॉकडाऊनमुळं विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत जाता येत नसल्याच त्यांना केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी शिक्षण विभागातर्फे करण्यात येईल.
वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकित आणि पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु केल्याची बाब सामंत यांनी स्पष्ट केली. उर्वरित सीईटी परिक्षांच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देत परीक्षा रद्द झालेल्या पण, या परीक्षांची फी भरलेल्या विद्यार्थ्यांची फी पुढील टर्मसाठी वापरण्यात येईल का अथवा ती परत करणं शक्य असे का असे विचार आपल्या विभागाकडून आणि मंत्रीमंडळाकडून केले जात असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच येथे सर्वतोपरी महत्त्वं देण्यात येणआर आहे असं सामंत म्हणाले.
Also Read- नागपूर शहरात २२ मे पर्यंत जुनेच आदेश लागू मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती