भारताच्या उदयवीरसिंगने जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील ज्युनियर मुलांच्या गटात २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. याच प्रकारात भारताने सांघिकमध्ये सुवर्णयश मिळवले. या दोन सुवर्णपदकांसह भारताचे एकूण २४ पदके झाली आहेत. यात नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि सात ब्राँझपदकांचा समावेश आहे.
ज्युनियर मुलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये उदयवीरने एकूण ५८७ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. त्याने प्रिसिजनमध्ये २९१ आणि रॅपिडमध्ये २९६ गुण मिळवले. अमेरिकेचा हेन्री टर्नर लेव्हेरेटने ५८४ गुणांसह रौप्यपदक, तर कोरियाच्या जीक्यून ली याने ५८२ गुणांसह ब्राँझपदक मिळवले. भारताच्या विजयवीरला (५८१) चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताचा तिसरा नेमबाज राजकंवरसिंग संधू (६५८) २०व्या स्थानावर राहिला. उदयवीर, विजयवीर आणि राजकंवरसिंग यांनी एकत्रित मिळून १७३६ गुण मिळवून सुवर्णयश मिळवले. चीनच्या संघाने (१७३०) रौप्यपदकाची कमाई केली, तर कोरियाच्या संघाने (१७२१) ब्राँझपदक पटकावले.
वरिष्ठ गटात शीराझ शेख स्कीटमध्ये पात्रता फेरीत आठव्या स्थानी राहिला, त्याने ४९ गुण मिळवले. अंगद वीरसिंग ४७ गुणांसह ६९व्या तर मिराज अहमद ४१ गुणांसह ७९व्या स्थानावर राहिला. या प्रकारात एकूण क्रमवारीत भारतीय संघ (१३७) १६व्या स्थानावर राहिला. स्पर्धेतील २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात भारताला पदक मिळवण्यात यश आले नाही. भारताचा गुरप्रीतसिंग ५८१ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. विजयकुमार (५७६) आणि अनिश भानवाला (५७६) अनुक्रमे २४व्या आणि २५व्या स्थानावर राहिले. विजयकुमारने लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक, तर अनिशने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. या प्रकारात भारतीय संघ १७३३ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेतून भारताला आतापर्यंत दोनच ऑलिंपिक कोटा मिळवता आले आहेत.
अधिक वाचा : अजिंक्य रहाणे कडे मुंबई संघाचे नेतृत्व