वर्धा : वर्धा-हिंगणघाट मार्गावर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. धोत्रा चौरस्ता शिवारात ही घटना घडली असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
दोन मित्र आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान दुचाकीस्वार लग्नसमारंभाला जात होते. त्यावेळी वाटेत वर्ध्याकडून हिंगणघाटकडे जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या आकाश गजानन पंचभाई आणि तुषार प्रमोद लोणारे या दोन मित्रांनी जागीच प्राण सोडले.
लग्नासाठी निघालेल्या या दोन तरुणांच्या मृत्यूने परिसरात मोठी खळबळ उडाली. तर याबाबतचं वृत्त धडकताच लग्न समारंभात शोककळा पसरली. घरातील तरुणं मुलं गमावल्याने पंचभाई आणि लोणारे कुटुंबाने मोठा आक्रोश केला.
या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याशी संपर्क केला असता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशभरात रस्ते अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे. वाहन चालवताना चालकांचं गाडीवर नियंत्रण राहत नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. परिणामी यामध्ये निष्पाप लोकांचा जीव जातो. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रत ठेवतच प्रवास करण्याची गरज ठळकपणे अधोरेखित होत आहे.