ATS ने पकडलेल्या दोघांची निर्दोष मुक्तता

नागपूर खंडपीठ

नागपूर : पुसद येथून २०१५ साली दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोन तरुणांना येथील एटीएसच्या विशेष न्यायालायने निर्दोष मुक्तता केली. अकोला येथील एटीएसच्या विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शोएब अहमद खान व मौलाना सलीम मलिक यांची निर्दोष मुक्तता केली.

२५ सप्टेंबर २०१५ रोजी बकरी ईदच्या दिवशी पुसद शहरातील मोहम्मदीया मशिदीबाहेर बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांवर अब्दुल मलिक या तरुणाने चाकू हल्ला केला होता. त्यात तीन पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी अब्दुल मलिकला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्याचे दोन साथीदार अहमद खान व मौलाना सलीम मलिक यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

त्यानंतर हा खटला अकोला येथील दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. अकोला येथील दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास केला. मात्र अकोल्याच्या एटीएसच्या विशेष न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करताना शोएब अहमद खान व मौलाना सलीम मलिक यांची निर्दोष मुक्तता केली. सर्व साक्षीदार न्यायालयात फितूर झाले. त्यामुळे या दोन आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडले, असं अकोला येथील एटीएसचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी सांगितलं.

या खटल्यात वकील दिलदार खान व वकील अली रजा खान या दोन वकिलांनी आरोपी तरुणांची बाजू मांडली होती. पोलिसांनी १८ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात ६० पेक्षा जास्त साक्षीदार तयार केले होते. मात्र यातील एकाही आरोपीचा थेट दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचं एटीएस सिद्ध करू शकले नाही, असं वकील अली रजा खान म्हणाले.

पोलिसांनी उगाचच या प्रकरणाला दहशतवादाचे स्वरूप दिले. परिणामी निर्दोष असलेले शोएब अहमद खान आणि मौलाना सलीम मलिक यांच्यावर दोन वर्ष खटला चालवला. मात्र कोर्टाने त्यांचा कुठल्याही दहशतवादी कारवाईशी संबंध नसल्याचं सांगत या दोघांची निर्दोष मुक्तता केली, असं अली रजा खान यांनी सांगितलं.

अधिक वाचा : Election 2019 – “Don’t Be Afraid” : Rahul Gandhi’s Message To Party On “Fake Exit Polls”