नागपूर: तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून कामचुकार आणि नियम न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी बैठक सुरु असताना मोबाईल वाजल्यामुळे एका अधिकाऱ्याला झापले होते. यानंतर पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांनी कामावर जीन्स घालून आलेल्या कर्मचाऱ्याला फैलावर घेतले.
आज नागूपर महानगरपालिकेत शिवजयंतीनिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तुकाराम मुंढे यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कान टोचले. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य आणि भूमिका जाणून घेतली पाहिजे. नागपूर शहराचा विकास आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या, हे आपले कर्तव्य आहे. मात्र, यामध्ये आपण कमी पडत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले.
१९५१ मध्ये नागपूर महापालिकेची स्थापना झाली. मात्र, इतक्या वर्षानंतरही पालिकेची परिस्थिती लांछनास्पद आहे. शहराचा विकास करण्याची खूप संधी आहे. त्यासाठी तुम्ही खुर्चीच्या बाहेर पडा, असा सल्ला मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करण्याविषयीही बजावले. तुमच्याकडून बोनाफाईड चुका झाल्या तर काही होणार नाही. मात्र, मॅनाफाईड चुका असतील तर नोकरीवर पाणी सोडावे लागेल. कर्मचाऱ्यांना आपल्या विभागात सर्वांशी संवाद ठेवावा. शिस्तीने काम करावे. मला केवळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंतच काम करायचे आहे, अशा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून काम करू नका. महापालिकेचा प्रत्येक कर्मचारी आपल्या विभागात कमिशनरच आहे. मात्र, प्रत्येकाचे तोंड वेगवेगळ्या दिशेला असल्याचा टोला मुंढे यांनी अधिकाऱ्यांना लगावला.