नागपूर : दक्षिणेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मेडिकलच्या मागील रस्ता व अजनीकडील मार्गावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीपासून रहिवाशी व वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. वंजारीनगर पाण्याची टाकी ते अजनी पुलापर्यंत पहिल्या ‘साऊंड प्रुफ’ उड्डाण पुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थान भूषवतील. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे राहतील.
दक्षिणेतील वाहन चालकांना दीड किलोमीटरचा वळसा घेऊन जावे लागते. लांब मार्ग आणि वाहतुकीची कोंडी यामुळे दोन दशकांपासून पुलाची मागणी होती. दक्षिणचे भाजपचे आमदार सुधाकर कोहळे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुलाचे काम सुरू होत आहे. सोबतच १०७ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांचेही भूमिपूजन करण्यात येईल. या मार्गावर एकीकडे रेल्वे शाळा तर, दुसरीकडे क्रीडांगण आहे.
महापालिकेच्या जागेवर रेल्वेची शाळा बांधण्यात आल्याचे लक्षात आले. यावर महापालिकेने पुलासाठी रेल्वेची जागा घेण्यात आली असल्याने त्यांना सिव्हिल लाइन्समधील जागा देण्यात आली आहे. या पुलासाठी केंद्रीय रस्ते निधीतून तब्बल ५३ कोटी रुपये देण्यात आले होते. मात्र, अंदाजपत्रकानुसार कामावरील खर्च कमी निघाला. या मार्गावरील शाळेतील विद्यार्थ्यांना वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नचा त्रास होऊ नये, यासाठी साऊंड प्रुफ पूल बांधण्यात येत आहे. ५०० मीटर लांबीच्या पुलावर १६ कोटी ७३ लाख रुपये खर्च होणार आहे. या पुलामुळे सुमारे एक किलोमीटर लांब वळसा घालण्याची वेळ येणार नाही. दीड वर्षात पुलाचे काम पूर्ण होईल, असा दावा सुधाकर कोहळे यांनी केला.
अधिक वाचा : नागपूर- नागभीड ब्रॉडगेज कामाला गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस