नागपूर- नागभीड ब्रॉडगेज कामाला गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर

नागपूर : नागपूर राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या नागपूर- नागभीड ब्रॉडगेज कामाला गती देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. हा प्रकल्प महाजनकोला अत्यंत फायदेशीर असून त्यामुळे अनेक कोटींची बचत होणार आहे. नागपूर नागभीड ही नॅरोगेज रेल्वेलाइन ब्रॉडगेजमध्ये बदलण्याच्या कामाला गेल्या वर्षी मंजूरी देण्यात आली होती.

११६ किलोमीटर लांबीच्या या कामाला सुमारे १४०० कोटी रूपयांचा खच अपेक्षित करण्यात येत आहे. तर त्यापैकी निम्मा खर्च राज्य सरकार करणार आहे. सदर काम महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत करण्यात येत आहे. तर त्यात केंद्रीय रेल्वे मंत्रालय, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्याकडून सहकार्य घेण्यात येत आहे. मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सुमारे ११६ किलोमीटर लांबीच्या या मार्गाच्या विकासाची घोषणा केंद्र सरकारने २०१३ -२०१४ च्या अर्थसंकल्पात केली होती. त्यावेळी ३७६ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित केला होता. त्यात १८८ कोटी राज्य सरकारने मंजुरी दिली होती. परंतु, त्यानंतर या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली. त्यामुळे राज्य सरकारवर अतिरिक्त १६५ कोटींचा भार पडला आहे. नागपूरला चंद्रपूर जिल्ह्याशी जोडण्यासाठी नागभीड रेल्वेमार्गाचे ब्रॅाडगेजमध्ये रूपांतर केल्यानंतर या मार्गावर एक्सप्रेस रेल्वेगाड्या सुरू करता येणार आहेत.

त्याशिवाय मुंबई, नागपूर, गोंदिया, कोलकाता आणि गोंदिया, वडसा, नागभीड, चंद्रपूर ते हैदराबाद या मार्गाचा विकास होणार आहे. याशिवाय महाजनकोला देखील कोळसा वाहतुकीसाठी नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. सदर मार्ग उमरेड येथील कोळसा खदानीकडून जाणार आहे. त्यामुळे चंद्रपूरकडे जाणारा कोळसा अल्पावधीत पाठवता येणार आहे. त्यामुळे महाजनकोलादेखील आर्थिक बचत करता येणार आहे.

अधिक वाचा : आता रेल्वेची दुरुस्ती करणार ‘उस्ताद’ रोबो, नागपूर रेल्वे विभागाची निर्मिती